विद्यापीठात परीक्षा संचालकांच्या दालनात गोंधळ; विद्यार्थी नेत्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 01:45 PM2024-08-19T13:45:53+5:302024-08-19T13:46:49+5:30
विद्यापीठात विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची दुसरी वेळ
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांच्या दालनात गोंधळ घातल्या प्रकरणात विद्यार्थी नेत्यावर तब्बल २४ दिवसांनंतर शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा बेगमपुरा पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. १७) दाखल करण्यात आला. परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांनी फिर्यादी दिली आहे. आरोपीमध्ये डॉ. प्रकाश इंगळे यांचा समावेश आहे.
विद्यापीठाच्या प्रभारी परीक्षा संचालक डॉ. गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २४ जून रोजी त्या पदवी परीक्षांचा निकाल लावण्यासंदर्भात गोपनीय बैठक घेत होत्या. तेव्हा डॉ. इंगळे यांनी विनापरवानगी त्यांच्या दालनात प्रवेश करत जोरजोरात आरडाओरड करून भीतीचे वातावरण निर्माण करत बैठकीत अडथळा आणला. मागील अनेक दिवसांपासून तक्रार कोणी करायची, यावरून विद्यापीठाच्या प्रशासनात खल सुरू होता. सुरक्षारक्षक, कुलसचिवांना फिर्याद देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यांनी तक्रार देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर थेट परीक्षा संचालकांनीच तक्रार दिली.
दुसऱ्यांदा गुन्हे दाखल
विद्यापीठात कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तोंडाला भगवे कापड गुंडाळून आलेल्या दुचाकीस्वारांनी धुडगूस घातला होता. त्याविरोधात कुलगुरूंच्या दालनाबाहेर विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले होते. त्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदविले होते. त्यानंतर विद्यापीठात आंदोलन करण्यासाठी पोलिसांची नव्हे, तर विद्यापीठाची परवानगी बंधनकारक केली. त्यानंतर आता विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला.
विद्यापीठ बनले आंदोलनाचे केंद्र
विद्यापीठात राेजंदारी कर्मचाऱ्यांनी मागील नऊ दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यानंतर शनिवारी बेराेजगार युवकांसह प्राध्यापकांनी विद्यापीठावर विराट मोर्चा काढला होता. काही दिवसांपूर्वी एसएफआय संघटनेतर्फे मोठे आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यामुळे विद्यापीठ सध्या आंदोलनाचे केंद्र बनत चालले आहे.
सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजे
गुन्हा दाखल झाल्याची माहिती आपल्याकडूनच समजली. परीक्षा संचालकांच्या कार्यालयात गोंधळ घातला असेल तर तेथील सीसीटीव्ही फुटेज समोर आणले पाहिजे. विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होत नसल्याने परीक्षा संचालकांना विनंती करण्यासाठी गेलो होतो. त्यावरून आता गुन्हे दाखल होत आहेत.
- डॉ. प्रकाश इंगळे, विद्यार्थी नेता