पाण्यासाठी चारही दिशेने आंदोलने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:08 AM2018-05-29T01:08:08+5:302018-05-29T01:08:22+5:30
शहराच्या चारही बाजूने सोमवारी पाण्यासाठी जोरदार आंदोलने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहराच्या चारही बाजूने सोमवारी पाण्यासाठी जोरदार आंदोलने करण्यात आली. सिडको एन-७ येथील पाण्याच्या टाकीवर मनपा टँकरचालकाला मारहाण करून पाणीपुरवठा बंद पाडण्यात आला. शहागंज पाण्याच्या टाकीवर संतप्त एमआयएम नगरसेवकांनी उपोषणाला सुरुवात केली. पाणी प्रश्नाला कंटाळलेल्या भाजप नगरसेविका जयश्री सुरेंद्र कुलकर्णी यांनी महापौरांना थेट राजीनामाच सादर केला. जिकडे तिकडे पाण्यासाठी एकच ओरड सुरू झाली. पाणी प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी मंगळवारी मुंबई आणि तामिळनाडू येथील तज्ज्ञ महापालिकेत दाखल होणार आहेत. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार मनपा उपाययोजना करणार आहे. तेव्हापर्यंत पावसाळा संपणार हे निश्चित.
मागील तीन महिन्यांपासून शहरात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहात ११४ नगरसेवकांनी घसा कोरडा होईपर्यंत अनेकदा ओरड केली. त्याचा किंचितही प्रभाव प्रशासनावर पडला नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाण्यासाठी जास्त ओरड सुरू आहे. जायकवाडीहून येणारे पाणीही मुबलक आहे. महापालिकेकडून नियोजन होत नसल्याने असमाधानकारक पाणीपुरवठा होत आहे. पाणी न आल्यास नागरिक थेट लोकप्रतिनिधीचा गळा धरत आहेत. ज्या दिवशी पाणीपुरवठा होणार त्या दिवशी नगरसेवकांना आता थरकाप उडत आहे. यापूर्वी कधीच पाण्याचा प्रश्न एवढा जटिल बनला नव्हता.
पाणीपुरवठ्याचे तज्ज्ञ
आज येणार
मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मुंबई येथील दशसहस्त्रबुद्धे आणि तामिळनाडू येथील पाणीपुरवठा क्षेत्रातील तज्ज्ञांना पाचारण केले आहे. मंगळवारी सकाळी हे तज्ज्ञ येणार असून, आयुक्त त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर शहरातील काही भागांत फिरून तज्ज्ञ माहिती घेतील. मनपाची पाणीपुरवठा योजना बघणार आहेत. त्यांच्या अहवालानुसार प्रशासन पुढील पाऊल उचलणार आहे.
शहागंज टाकीवर उपोषण
सोमवारी सकाळी एमआयएम नगरसेवकांनी शहागंज पाण्याच्या टाकीवर उपोषण सुरू केले. या टाकीवरील जवळपास १८ वॉर्डांना मागील काही दिवसांपासून पाच दिवसांआड म्हणजेच सहाव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. शहरातील कोणत्याच टाकीवर पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत नाही. ऐन रमजान महिन्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. संपूर्ण शहरात तीन दिवसांआड पाणी देण्यात येत आहे. शहागंज भागातील वॉर्डावरच अन्याय का? असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. या उपोषणाची माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडेले, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग तेथे पोहोचले. त्यांनी नगरसेवकांची समजूत घातली. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.