वीज बिल माफीसाठी आंदोलक आक्रमक; अधिकारी अनुपस्थित असल्याने कक्षाच्या दाराला दिले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 01:36 PM2020-10-27T13:36:57+5:302020-10-27T13:38:51+5:30
महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांच्या दालनाच्या दाराला डावी लोकशाही आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
औरंगाबाद : वीज बिलाच्या माफीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी डावी लोकशाही आघाडी औरंगाबादतर्फेमहावितरण अधिकाऱ्यांच्या दालनाच्या दारालाच निवेदन देण्यात आले. कोणतीही घोषणाबाजी न करता आंदोलकांनी मागण्यांकडे लक्ष वेधले.
कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट लक्षात घेता दरमहा ३०० युनिटच्या आत वीज वापर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांची गेल्या सात महिन्यांची संपूर्ण वीज देयके माफ करण्यात यावी आणि त्यासाठी राज्य सरकारने अनुदान द्यावे, या मागणीसाठी मंगळवारी डावी लोकशाही आघाडी औरंगाबाद यांच्यावतीने महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांना निवेदन देण्यात येणार होते. त्यानुसार सकाळी ११.३० वाजता आंदोलक महावितरणच्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक हे कार्यालयात नसल्याची माहिती त्यांना मिळाली. तेव्हा आंदोलकांनी थेट त्यांच्या दालनाकडे कूच केली. यावेळी अधिकाऱ्यांच्या बंद कक्षाच्या दारासमोर आंदोलक एकत्रित जमले आणि दारालाच निवेदन दिले.
ही बाब कळताच अधिक्षक अभियंता त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारत मागण्या जाणून घेतल्या. यावेळी राम बाहेती, सुभाष लोमटे, ऍड. अभय टाकसाळ, अश्फाक सलामी, अजमल खान, काझी शकील अहमद, संजय पाटील, भगवान भोजने, अब्दुल हई कादरी आदींची उपस्थिती होती. वीज कट करणे, व्याज लावणे थांबवा आर्थिक संकटामुळे वीज बिल भरण्यास अडचण येत आहे. परंतु महावितरण वीज कट करत आहे, व्याजावर व्याज लावत आहे. हे तात्काळ थांबवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.