बेंगलोर उच्च न्यायालयाचे बनावट आदेश आरोपीने पाठवले आग्रा पोलीस महानिरीक्षकांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:34 PM2019-07-20T23:34:04+5:302019-07-20T23:34:31+5:30
पैशांच्या बॅग पळविण्याच्या गुन्ह्यात साथीदारासह अटक विष्णूसिंग ऊर्फ विशालसिंग (रा. उत्तर प्रदेश) याने त्याच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द केल्याचा बेंगलोर उच्च न्यायालयाचा बनावट आदेश आग्राच्या पोलीस महानिरीक्षकांना पाठविला होता. याबाबत त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले. विशालसिंगविरुद्ध बंगळुरू येथेही मंगळसूत्र चोरीसह लुटमारीचे ११ गुन्हे नोंद आहेत.
औरंगाबाद : पैशांच्या बॅग पळविण्याच्या गुन्ह्यात साथीदारासह अटक विष्णूसिंग ऊर्फ विशालसिंग (रा. उत्तर प्रदेश) याने त्याच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द केल्याचा बेंगलोर उच्च न्यायालयाचा बनावट आदेश आग्राच्या पोलीस महानिरीक्षकांना पाठविला होता. याबाबत त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले. विशालसिंगविरुद्ध बंगळुरू येथेही मंगळसूत्र चोरीसह लुटमारीचे ११ गुन्हे नोंद आहेत.
बँकेतून मोठ्या रकमा काढणाऱ्यांवर पाळत ठेवून त्यांच्या बॅग पळविल्याप्रकरणी गुन्हे शाखेने आरोपी विष्णूसिंग ऊर्फ विशालसिंग, सोनूसिंग उमाशंकरसिंग आणि संदीप सतू सोनकर (सर्व रा. उत्तर प्रदेश) यांना काही दिवसांपूर्वी अटक केली. गुन्हे शाखेचे पथक आरोपींना घेऊन त्यांच्या मूळगावी गेले तेव्हा तेथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विशालसिंगविरुद्ध बंगळुरू येथे विविध ११ गुन्हे नोंद असल्याचे समजले. मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यात त्याला तेथे २०१२ मध्ये अटकही झाली. तो २०१५ मध्ये जेलमधून जामिनावर सुटला आणि पसार झाला. खटल्याच्या सुनावणीसाठी तो हजर राहत नसल्याने विविध न्यायालयांनी त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट काढून उत्तर प्रदेश पोलिसांना पाठवले होते. विशालसिंगला हे समजल्यानंतर त्याने बेंगलोर उच्च न्यायालयाचे बनावट आदेश आग्ºयाच्या पोलीस महानिरीक्षकांना पाठविले. या आदेशात, विशालसिंग विदेशात उपचार घेण्यासाठी दाखल असल्याने त्याच्याविरोधातील सर्व अटक वॉरंट रद्द करण्यात आल्याचे नमूद होते. हे आदेश प्राप्त झाल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी बेंगलोर उच्च न्यायालयास कळविल्यानंतर आरोपीने केलेली बनवेगिरी उघड झाली होती. फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो बनावट आधार कार्ड, पॅनकार्डसह ओळखपत्रे तयार करून वावरत होता. त्याला औरंगाबाद पोलिसांनी पकडल्याचे कळताच बंगळुरू पोलिसांनी त्याला अटक करणार असल्याचे औरंगाबाद पोलिसांना कळविल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली. सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, कर्मचारी शिवाजी झिने, राजेंद्र साळुंके, प्रकाश चव्हाण, नितीन देशमुख, प्रभाकर राऊत, दादासाहेब झारगड, संदीप क्षीरसागर तपास करीत आहेत.
चौकट
महाराष्ट्रात ८ गुन्ह्यांची कबुली
आरोपीने औरंगाबादेत ३ गुन्हे केल्याची कबुली दिली. शिवाय सोलापुरात २, जळगावात एक, सांगलीत २ गुन्हे केल्याचे सांगितले. लाखो रुपयांच्या बॅग पळविल्यानंतर आरोपींनी या पैशांची बारबाला आणि जुगारात उधळपट्टी केल्याचे तपासात समोर आले. आरोपीच्या खात्यातील जमा २ लाख ७७ हजार रुपये पोलिसांनी गोठविले. शिवाय त्यांच्याकडून रोख २४ हजार रुपये आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे.