औरंगाबाद शहर बससाठी एस.टी.सोबत करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:25 AM2018-10-11T00:25:28+5:302018-10-11T00:26:32+5:30
औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेत महापालिका १०० मिडी बस खरेदी करणार आहे. दिवाळीपूर्वी ३० पेक्षा अधिक बस टाटा कंपनीकडून ...
औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेत महापालिका १०० मिडी बस खरेदी करणार आहे. दिवाळीपूर्वी ३० पेक्षा अधिक बस टाटा कंपनीकडून प्राप्त होणार आहेत. या बस चालविण्याची जबाबदारी आज एस.टी. महामंडळाने स्वीकारली. महामंडळाने नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेचा मुहूर्त साधत महापालिकेसोबत सामंजस्य करारही केला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी एस.टी. आणि मनपा यांच्यातील हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. पाच वर्षे महामंडळ बस चालविण्याची सेवा देणार आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात परिवहनमंत्री दिवाकर रावते, खा. चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभापती राजू वैद्य, सभागृहनेते विकास जैन यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी झाली. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंग देओल आणि स्मार्ट सिटीच्या एसपीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका आयुक्त यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. महापालिकेने खरेदी केलेल्या १०० बस पाच वर्षांसाठी एस.टी. महामंडळ चालविणार, असे करारात ठरले. आॅक्टोबर अखेरपर्यंत बस शहरात दाखल होतील. उर्वरित बस जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत येतील. प्रवासी वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न दररोज स्मार्ट सिटी विकास महामंडळात जमा होईल. तिकीट दर, वाहतुकीचे मार्ग ठरविण्याचा अधिकारही स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाला राहील. १०० बससाठी लागणारे मनुष्यबळ, बसची देखभाल, पार्किंग व्यवस्था एस.टी. महामंडळ करणार आहे. याबाबत एस.टी.ला दरमहा ठराविक भाडे देण्यात येईल. बससेवा सुरू करण्यासाठी लागणाºया सर्व परवानग्या मिळविण्याची जबाबदारी स्मार्ट सिटीची म्हणजेच मनपाची राहणार आहे. बसथांबे अद्ययावत करणे, जागा निश्चित करण्याचे काम मनपाचे राहणार आहे. ठिकठिकाणी नियंत्रण कक्ष उघडण्यात येतील. शालेय विद्यार्थी, अंध, दिव्यांग बांधवांना या सेवेत अनुक्रमे ६७, ७५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. औरंगाबाद शहरात १९९१ पासून एस.टी. महामंडळ शहर बससेवा चालवत आहे. आतापर्यंत महामंडळाला १ हजार १८७ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.
बससेवेची वैशिष्ट्ये
१२५ रस्त्यांवरून नवीन बस धावतील.
४५० कर्मचारी एस.टी.चे राहतील.
११० बसथांबे अद्ययावत उभारणार.