'स्मार्ट ग्राम'मध्ये स्थापन झालेली 'कृषी अवजारे बँक' अनेक शेतकऱ्यांना ठरतेय वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 05:56 PM2019-08-17T17:56:22+5:302019-08-17T18:03:19+5:30
शेतकऱ्यांना सर्व प्रकाराची मशागतीची अवजारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
- बालाजी आडसूळ
कळंब (जि. उस्मानाबाद) : शेतकऱ्यांना मशागतीसाठी माफक दरात कृषी अवजारे उपलब्ध व्हावीत याकरीता स्मार्ट ग्राम कन्हेरवाडी ग्रामपंचायतने गावात अभिनव अशी ‘कृषी अवजारे बँक’ स्थापन केली आहे. या बँकेतून मल्चिंग यंत्रापासून ते कीटकनाशकांच्या फवारणीसाठीचे फवारे असे विविध साहित्य शेतकऱ्यांना मिळणार आहे.
तालुक्यातील कन्हेरवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामविकास समितीने मागील काही वर्षात गावातील भौतिक विकास व मानवी निर्देशांकात वृद्धी व्हावी यासाठी व्यापक काम केले आहे. यामुळेच गावातील नागरिकांसाठी ‘आदर्श’ ठरलेल्या या गावास राज्य शासनानेही ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार देवून गौरव केला आहे. गावातील रस्ते, शाळा, परिसर विकासात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून आदर्श गावाचा कित्ता गिरविणाऱ्या या गावाने आता कृषी विकासाकडेही जाणिवपूर्वक लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. याच संकल्पनेतून राज्यात आगळा वेगळा असा ‘कृषि अवजारे बँक’ स्थापन करण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला. याकामी ग्रामविकास समितीचे अध्यक्ष अॅड. रामराजे जाधव, सरंपच वर्षा रामराजे जाधव, उपसरपंच मुंकूद मिटकरी व सर्व सदस्यांनी मूर्त स्वरूप देण्यासाठी पावले उचलली.
याकरिता ग्रामपंचायतला वित्त आयोगाच्या मिळणाऱ्या निधीचा सदुपयोग करण्याचा निर्णय झाला. यानुसार कृषी उपजिविका अंतर्गत गावातील शेतकऱ्यांना सर्व प्रकाराची मशागतीची अवजारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. गावातील मध्यम व अल्पभूधारक शेतकऱ्यांना पिकांवरील कीडरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व अंतर्गत मशागतीसाठी अनेक कृषी अवजारांची गरज भासते. अशा शेतकऱ्यांना प्रगत तंत्राचा अवलंब करणं आर्थिकस्थितीमुळे शक्य नसतं. या शेतकऱ्यांना माफक दरात कृषी अवजारे उपलब्ध करून देण्यासाठी ग्रापने पुढाकार घेतला आहे.
विविध प्रकारच्या यंत्राचा समावेश...
कन्हेरवाडी ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या कृषी अवजारे बँकेत शेतीच्या अंतर्गत मशागतीसाठी व कीडरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक विविध यंत्रसामुग्रीचा समावेश आहे. यात अत्याधुनिक बैल पेरणी यंत्र, भोद व मल्चिंग यंत्र, ३० केव्हीए क्षमतेचा व ३ पंप चालू शकतील असा अल्टरनेट डायनामा, तीर्री, पंजी, इंजिन, हात व बॅटरीवरील फवारे आदी साहित्य उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी नाममात्र भाडे आकारले जाणार आहे, असे अॅड. रामराजे जाधव यांनी सांगितले.
राज्यातील अभिनव उपक्रम....
कन्हेरवाडी ग्रामपंचायतीने गावातील शेतकऱ्यांना सर्वप्रकारची कृषी अवजारे सहज उपलब्ध व्हावीत यासाठी सुरू केलेल्या ‘कृषी अवजारे बँके’ चा शुभारंभ नुकताच आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांची प्रमूख उपस्थीती होती. अशा प्रकारचा राज्यातील पहिला उपक्रम असल्याचा ग्रामपंचायतीचा दावा आहे.
यापूवीर्ही राबवले आहेत विविध उपक्रम...
कन्हेरवाडी ग्रापंने घर तिथे शौचालय, भूमिगत गटार, सोलार हाय मास्ट, सर्व एलईडी पथदिवे, इलर्निंग व डिजीटल शाळा तथा अंगणवाडी, गावाला शुद्ध व थंड पाणी, ठिबकवर जोपालेली वृक्षवल्ली, सॅनीटरी नॅपकीन वेंडीग मशीन असे विविध उपक्रम राबवून गावाला ‘आदर्श ग्राम’ अशी ओळख करून दिली आहे.