दीड लाखाची लाच घेताना कृषी सहायक जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:04 AM2021-04-28T04:04:07+5:302021-04-28T04:04:07+5:30
औरंगाबाद : सीताफळाच्या बागेसाठी शासनाचे फळबाग अनुदान मंजूर करून दिल्याबद्दल शेतकऱ्याकडून १ लाख ४५ हजार रुपयांची लाच घेणारा जंभाळा ...
औरंगाबाद : सीताफळाच्या बागेसाठी शासनाचे फळबाग अनुदान मंजूर करून दिल्याबद्दल शेतकऱ्याकडून १ लाख ४५ हजार रुपयांची लाच घेणारा जंभाळा येथील कृषी सहायक व मध्यस्थ खासगी व्यक्ती अशा दोघा जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पडकले.
गंगापूर तालुका कृषी कार्यालयांतर्गत जंभाळा येथे कार्यरत कृषी सहायक अरविंद्र वांडेकर व शेतकऱ्याकडून घेणारा किशोर काशिनाथ कांडेकर (रा. पेकळवाडी, ता. गंगापूर) या दोघांना अटक करण्यात आली असून दौलताबाद ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार शेतकऱ्याच्या वडिलांच्या नावे गंगापूर तालुक्यातील इस्माईलपूर येथे शेती आहे. त्या शेतात सीताफळांची लागवड करण्यात आलेली आहे. सीताफाळाच्या बागेसाठी शासनाचे फळबाग अनुदान मंजूर झालेले आहे. हे अनुदान मंजूर करून दिल्याच्या मोबदल्यापोटी कृषी सहायक अरविंद्र वांडेकर याने शेतकऱ्याकडे १ लाख ४५ हजार रुपयांची मागणी केली होती. एवढी मोठी रक्कम देण्याची इच्छा नसल्यामुळे शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन रीतसर तक्रार दिली. त्यानुसार या विभागाच्या पोलिसांनी तक्रारीची खातरजमा केल्यानंतर मंगळवारी दुपारी फतियाबाद येथे सोलापूर - धुळे महामार्गावर एका हॉटेलजवळ सापळा रचला. ठरल्याप्रमाणे कृषी सहायक वांडेकर व खासगी व्यक्ती किशोर कांडेकर हे दोघेही ते आले. ठरलेल्या व्यवहारानुसार कृषी सहायकासाठी मध्यस्थ म्हणून किशोर कांडेकर याने शेतकऱ्याकडून १ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम घेताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहाथ पकडले.
पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, उपाधीक्षक बी. व्ही. गावडे यांच्या मार्गदर्शनखाली निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, कर्मचारी बाळा राठोड, अशोक नागरगोजे, रवींद्र काळे आदींनी यशस्वी केली.