एकरात नव्हे गुंठ्यात राहिली शेतजमीन; कामाच्या शोधात शेतकरी शहरात!

By विकास राऊत | Published: October 11, 2023 12:15 PM2023-10-11T12:15:17+5:302023-10-11T12:26:59+5:30

भूमिहीन होताहेत शेतकरी : रोजगारासाठी स्थलांतर होण्याचे प्रमाणही वाढले

Agricultural land remained in Guntha, not acres; Farmers looking for work in the city! | एकरात नव्हे गुंठ्यात राहिली शेतजमीन; कामाच्या शोधात शेतकरी शहरात!

एकरात नव्हे गुंठ्यात राहिली शेतजमीन; कामाच्या शोधात शेतकरी शहरात!

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील शेतजमीन कमी होत चालली आहे. भूसंपादन, कौटुंबिक वादातून होणाऱ्या वाटण्या, विविध कारणांमुळे शेतीची होणारी विक्री. या व इतर अनेक कारणासंह नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेती एकरातून गुंठ्यांवर आली. वाढलेल्या कुटुंबांचे त्यात भागत नाही. त्यामुळे कामाच्या शोधात शेतकरी शहरात येण्याचे प्रमाणही वाढले आहे. रोहयो कामांवर देखील शेतकरी जास्त आहेत.

तज्ज्ञांच्या मते शेतीक्षेत्र का घटतेय?
वाटण्या वाढल्या : घराघरात वाटण्या झाल्यामुळे शेतजमिनीचे क्षेत्र कमी होत आहे. जास्तीची जमीन असलेल्या शेतकऱ्यांचा आकडा आता कमी आहे. शेतकरी भूमिहीनदेखील होत आहेत.

विविध प्रकल्पांसाठी भूसंपादन : महामार्ग, जलप्रकल्प, उद्योग, अंतर्गत रस्त्यांसाठी भूसंपादनामुळे जमिनी कमी होत चालल्या आहेत. जिल्ह्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात भूसंपादन झाले.

शेतविक्री वाढली : तुकडाबंदीमुळे दोन वर्षांपासून १ एकरच्या पुढेच जमिनीची विक्री वेगवेगळ्या कारणांसाठी होत आहे. कुटुंबे वाढल्यामुळे शेती विकून जबाबदारी पूर्ण करण्याचे प्रमाण वाढले आहे.

भूसंपादन वाढले...
सोलापूर-धुळे महामार्गासाठी भूसंपादन : १ हजार हेक्टर
समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन : १२०० हेक्टर
डीएमआयसीसाठी भूसंपादन : ४ हजार हेक्टर

जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे किती आहे जमीन....?
शेतजमीन (हेक्टरमध्ये)... भूधारक .... एकूण क्षेत्रातील वाटा (टक्के)
० ते २....१,५२०३४.५७ ...२,९३,७१६.........२१ टक्के
२ ते ५....२३८२१४.७८...१,८५,३७३.......३२ टक्के
५ ते १०...३५७१७६.१९...१०६६७६......४७ टक्के

शेतीचे क्षेत्र कमी होणे घातक
शेतकरी, शेतमजूर शेतीवर अवलंबून आहे. शेतीचे क्षेत्र कमी होणे हे घातक आहे. भूमिहीन होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. रोहयोवर शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. नागरीकरण वाढणे, सिंचन, उद्योग, रस्ते प्रकल्पांसाठी जमिनी घेण्यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्यांचे हाल होऊ लागले आहेत. त्यातच वाटण्यांमुळे शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. यावर वेळीच उपाय आवश्यक आहेत.
-प्रा. राम बाहेती, कार्याध्यक्ष शेतमजूर युनियन


शेतकरी शेतीतून बाहेर पडत आहेत...
शासनाचे फुकट वाटप हे धोरण चुकीचे आहे. हे धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. शेतकरी शहरात येण्याचे प्रमाण वाढले आहे. उद्योगांसाठी जमिनी घेतल्या. ज्यांच्या जमिनी गेल्या, ते आता बेरोजगार आहेत. भूसंपादनाचे आलेले पैसेही संपले आहेत. भूमिहीन शेतकरी पर्यायाने शहराकडेच येणार हे स्पष्ट आहे. भांडवलदारांकडे जमिनी गेल्या आहेत.
-जयाजी सूर्यवंशी, अध्यक्ष अन्नदाता शेतकरी संघटना

Web Title: Agricultural land remained in Guntha, not acres; Farmers looking for work in the city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.