लाच घेताना कृषी पर्यवेक्षक, सहायक चतुर्भुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:13 AM2018-07-17T01:13:16+5:302018-07-17T01:13:45+5:30
सिल्लोड कृषी विभागांतर्गत नाला दुरुस्ती काम पूर्ण केल्याबाबत पूर्णत्वाच्या दाखल्यावर सही करून लाच घेणारा कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायकाला लाचलुचपत अधिकाऱ्यांनी तालुका कृषी विभागाच्या कार्यालयाशेजारी एका चहाच्या टपरीवर रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.१६) संध्याकाळी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिल्लोड : सिल्लोड कृषी विभागांतर्गत नाला दुरुस्ती काम पूर्ण केल्याबाबत पूर्णत्वाच्या दाखल्यावर सही करून लाच घेणारा कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायकाला लाचलुचपत अधिकाऱ्यांनी तालुका कृषी विभागाच्या कार्यालयाशेजारी एका चहाच्या टपरीवर रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.१६) संध्याकाळी करण्यात आली.
कृषी पर्यवेक्षक भारत बन्सीलाल जाधव (४२, रा. औरंगाबाद) यास १५ हजारांची लाच घेताना पकडण्यात आले, तर कृषी सहायक संतोष अनंता पवार (३८, रा.बालाजीनगर सिल्लोड) यास २५ हजार रुपये लाच घेताना ताब्यात घेतले.
सिल्लोड येथील तक्रारदार फर्मच्या वतीने कृषी विभागांतर्गत नाला दुरुस्तीचे काम केले होते. सदर काम पूर्ण केल्याबाबत पूर्णत्वाच्या दाखल्यावर सही देण्यासाठी भारत जाधव याने १५ हजार व संतोष पवार याने २५ हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी औरंगाबादेतील लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली.
पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, उपअधीक्षक वर्षाराणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नितीन देशमुख, गणेश पडुरे, रवी देशमुख, रवींद्र अंबेकर, राजपूत यांनी सापळा रचून सोमवारी संध्याकाळी सिल्लोड येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाजवळील चहाच्या टपरीवर वरील दोन्ही आरोपींना तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.