कृषी उन्नती योजनेंतर्गत भाडे तत्त्वावर कृषी औजारांची बँक
By Admin | Published: May 8, 2017 12:11 AM2017-05-08T00:11:53+5:302017-05-08T00:12:56+5:30
लातूर : भाडेतत्वावर यांत्रिकी सेवा पुरवठ्यासाठी कृषी औजारांची बँक स्थापन करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : राष्ट्रीय कृषी उन्नती योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यात येत असून, या अभियानाअंतर्गत भाडेतत्वावर यांत्रिकी सेवा पुरवठ्यासाठी कृषी औजारांची बँक स्थापन करण्यात येत आहे. शेतीमधील मजुरीवर होणाऱ्या खर्चाची बचत करणे आणि मशागतीची कामे वेळेवर जलदगतीने करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यात येत आहे.
राष्ट्रीय कृषी उन्नती योजनेअंतर्गत अनुदानावर ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टरचलित नांगर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, लावणी यंत्र, स्वयंचलित औजारांमध्ये चाफकटर, रिपर कम् बाईडर, ट्रॅक्टर चलित मळणी यंत्र, कल्टीव्हेटर, मिनी भात मिल, डाळ मिल, पूरक यंत्र संच, ट्रॅक्टरचलित् फवारणी यंत्र, मिस्ट ब्लोअर, सबसायलर, प्रक्रिया संयंत्रे, कापूस पहटी थेडर, ऊस पाचक कुटी, मल्चर आदी औजारे अनुदानावर मिळणार आहेत.
कृषी औजारांच्या बँकेतून ही औजारे उपलब्ध केली जाणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी २० दिवसांचा अवधी आहे. अर्जाचा नमुना कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी अर्ज करताना विहीत नमुन्यात अर्ज करणे बंधनकारक आहे.
सात-बारा, ८ अ उतारा, खरेदी करावयाचे ट्रॅक्टर अथवा औजारांचे कोटेशन, मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला, ओळखपत्र आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत. ट्रॅक्टर चलित यंत्र अथवा औजारांसाठी अर्ज करताना अर्जाबरोबर त्याच्याकडे ट्रॅक्टर असल्याच्या पुराव्याची (आरसी बुक) स्वयंसाक्षांकित झेरॉक्स प्रत सादर करणे आवश्यक आहे.