फळबाग योजनेच्या बिलासाठी शेतकऱ्याकडून ४ हजारांची लाच; कृषी सहायक एसीबीच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 07:00 PM2024-10-08T19:00:52+5:302024-10-08T19:01:07+5:30

बिल काढण्यासाठी ५ हजार रुपये मागून तडजोडीअंती ४ हजार रुपयांची लाच स्वीकारली

Agriculture Assistant arrested by ACB while accepting 4,000 rupees bribe from farmer for Orchard scheme bill | फळबाग योजनेच्या बिलासाठी शेतकऱ्याकडून ४ हजारांची लाच; कृषी सहायक एसीबीच्या ताब्यात

फळबाग योजनेच्या बिलासाठी शेतकऱ्याकडून ४ हजारांची लाच; कृषी सहायक एसीबीच्या ताब्यात

सिल्लोड: फळबागचे मग्रारोहयो योजनेतून मस्टर बिल काढण्यासाठी  सिल्लोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहायक श्रीकांत मधुकर डुकरे ( ३७ वर्षे रा. बालाजी नगर सिल्लोड) यास एका झेरॉक्स सेंटरवर आज दुपारी शेतकऱ्याकडून ४ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जेरबंद केले. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

चिंचपूर शिवारात एका शेतकऱ्यांने शेत गट नंबर १५० मध्ये फलबाग लावली आहे. या फळबागाचे महाराष्ट्र शासनाच्या मग्रारोहयो योजनेमधून मस्टर बिल काढण्यासाठी कृषि सहायकाने शेतकऱ्यास ५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ४ हजार रुपये लाच देण्याचे ठरले. मात्र, लाच देण्याची तयारी नसल्याने शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने तक्रारीची पडताळणी करून आज दुपारी शहरातील एका झेरॉक्स सेंटरवर सापळा रचला. येथे शेतकऱ्याकडून ४ हजारांची लाच घेताच एसीबी पथकाने कृषी सहायकास ताब्यात घेतले.

ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव , पोलीस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे  यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी  पोलीस निरीक्षक केशव दिंडे, पोहेकॉ अशोक नागरगोजे, राजेंद्र सिनकर,  देवसिंग ठाकुर यांनी केली. 

Web Title: Agriculture Assistant arrested by ACB while accepting 4,000 rupees bribe from farmer for Orchard scheme bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.