सिल्लोडमध्ये क्रांती कृषीसेवा केंद्रावर कृषी विभागाची धाड; पाच तास कसून तपासणी, नमुने घेतले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 08:33 PM2023-06-14T20:33:56+5:302023-06-14T20:34:52+5:30
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे अगदी जवळचे समजले जाणारे व सिल्लोड तालुका कृषिसेवा केंद्राचे तालुका अध्यक्ष बापू पाटील यांच्या मालकीचे हे केंद्र आहे.
सिल्लोड: शहरातील क्रांती कृषीसेवा केंद्र व त्यांच्या गोदामावर बुधवारी सकाळी ११ वाजता कृषी विभागाच्या जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथकाने धाड टाकल्याने खळबळ उडाली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे अगदी जवळचे समजले जाणारे व सिल्लोड तालुका कृषिसेवा केंद्राचे तालुका अध्यक्ष बापू पाटील यांच्या मालकीचे हे केंद्र आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खते कीटकनाशके याबाबत तक्रार निवारण करण्यासाठी सिल्लोड तालुक्यात गुण नियंत्रण जिल्हास्तरीय पथकातील जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड येथील उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरधे, जिल्हा कृषी अधिकारी प्रशांत पवार, पंस कृषी अधिकारी संजय व्यास, संतोष भालेराव यांनी क्रांती कृषिसेवा केंद्राची कसून तपासणी केली. त्यात बियाणे आवक साठा, विक्री झालेले बियाणे याची सखोल चौकशी करून दोन गोडावून तपासण्यात आले.
बुधवारी सकाळी ११ वाजता अचानक भरारी पथकाने सिल्लोड शहरात मुख्य दुकानदार व कृषिसेवा केंद्राचे तालुकाध्यक्ष पाटील यांच्या केंद्रावर धाड टाकळी. त्यांचे शहरात दोन गोदाम आहेत. पथकातील काही सदस्यांनी गोदामवर तर काहींनी क्रांती कृषिसेवा केंद्रावर धाड टाकली. बघता बघता सिल्लोड शहरात ही बातमी वाऱ्या सारखी पसरली यामुळे काहीं दुकानदारांनी धाकापायी केंद्र बंद करून पळ काढला. सकाळी सुरू झालेली तपासणी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत चालली.
तपासणीसाठी काही नमुने घेतले
चड्याभावाने बियाणे खते विक्री केल्या जाते का याची तपासणी करून गोदामात असलेला बियाण्यांचा साठा व विक्री याची तपासणी केली. अद्यापतरी अनियमितता आढळून आली नाही. मात्र, काही बियाण्यांचे नमुने आम्ही घेतले असून त्याची प्रयोग शाळेत तपासणी केल्यावर अधिक माहिती देणे योग्य होईल अशी माहिती तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरधे यांनी दिली.
आम्ही काहीच गुन्हा नाही केला...
पथकाने तपासणी केली आहे. नियमानुसार सर्व कागदपत्रे दाखवले आहेत. आम्ही चढ्याभावने बियाणे विक्री केले नाही किंवा बोगस बियाणे विक्री केले नाही. किरकोळ काही त्रुटी असतील तर त्या पूर्ण केल्या जातील. कुणी कितीही तपासणी केली तर फरक पडत नाही. आम्ही कोणताच गुन्हा केला नाही.
- बापू पाटील, क्रांती कृषिसेवा केंद्र चालक