बनावट बियाणे, रासायनिक खतांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभाग सरसावला
By बापू सोळुंके | Published: May 8, 2024 01:27 PM2024-05-08T13:27:01+5:302024-05-08T13:27:22+5:30
यासाठी कृषी विभागाने तालुका, विभाग आणि जिल्हास्तरीय अशी सुमारे १० भरारी पथके आणि प्रत्येक तालुक्यात एक तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर : बोगस बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशक शेतकऱ्यांच्या माथी मारून उखळ पांढरे करून घेणाऱ्या व्यापारी, कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे.
यासाठी कृषी विभागाने तालुका, विभाग आणि जिल्हास्तरीय अशी सुमारे १० भरारी पथके आणि प्रत्येक तालुक्यात एक तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जून महिन्यात शेतकरी खरीप हंगामातील पिकांची पेरणी करत असतात. यामुळे आतापासूनच खरीप हंगामपूर्व शेतीच्या मशागतीची सुरुवात शेतकऱ्यांकडून सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत शेतकरी खरीप हंगामासाठी बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या खरेदीसाठी बाजारात येतील. जिल्ह्यासाठी आवश्यक तेवढे खत आणि बियाणे कृषी विभागाकडून उपलब्ध करण्यात आली आहे.
गतवर्षी विशिष्ट वाणांचा तुटवडा बियाणे विक्रेत्यांकडून होत असतो. तसेच बऱ्याचदा बोगस बियाणे आणि रासायनिक खते शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते. असे प्रकार रोखण्यासाठी कृषी विभाग सक्रिय झाला आहे. कृषी विभागाने जिल्ह कृषी अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एक आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एक याप्रमाणे जिल्ह्यात एकूण १० भरारी पथके नियुक्त करण्यात आले आहे. यासोबतच खते आणि बियाणांसंबंधी तक्रार करण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर प्रत्येकी एक याप्रमाणे १० तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागात ३० निरीक्षक आहेत. यात जिल्हास्तरीय ६, उपविभाग स्तरावर ६ आणि तालुकास्तरावर १८ निरीक्षकांचा यात समावेश आहे. या अधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील बियाणे, खते आणि कीटकनाशक विक्री दुकानांची आणि गुदामांची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक भेटीत अधिकारी कीटकनाशक, रासायनिक खते आणि विविध बियाणांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेला तपासणीसाठी पाठविणार आहे. प्रयोगशाळेच्या तपासणीत बोगसगिरी आढळून आल्यास संबंधित बियाणे, खताचा साठा जप्त केला जातो. पोलिस केस, खटला दाखल करणे अशा प्रकारची कारवाई केली जाते.
जिल्ह्यातील बियाणे विक्रेत्यांची संख्या-- २५२१
परवानाधारक रासायनिक खत विक्रेत्यांची संख्या-२५४०
कीटकनाशक विक्रेत्यांची संख्या- १४९६
कृषी निरीक्षकांना १९०५ नमुन्यांची तपासणीचे उद्दिष्ट
बियाणे -११९३
खते- ५२३
कीटकनाशक- १८९