कृषी विभाग करणार सीड पार्कची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:21 PM2017-11-14T23:21:41+5:302017-11-14T23:21:44+5:30

जालना येथील सीड पार्कची उभारणी कृषी विभाग करणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

Agriculture Department to setup Seed Park | कृषी विभाग करणार सीड पार्कची उभारणी

कृषी विभाग करणार सीड पार्कची उभारणी

googlenewsNext

जालना : मराठवाड्यातील ४० हजार लोकांना रोजगार देणा-या आणि सुमारे ६ हजार कोटींची वार्षिक उलाढाल करण्याची क्षमता असलेल्या जालना येथील सीड पार्कची उभारणी कृषी विभाग करणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
खा. दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि व कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांची भेट घेऊन जालन्यातील बियाणे उद्योजकांची मागणी लक्षात घेऊन हा प्रकल्प कृषी विभागामार्फत उभारण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच या पार्कमधील मूलभूत सुविधा महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी केली होती. त्यानुसार ही मागणी मान्य करण्यात आली असून, या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीस लवकरच सुरुवात होणार आहे.
बियाणे निर्मिती उद्योगात जगात भारत सहाव्या क्रमांकावर असून, या उद्योगाची देशातील वार्षिक उलाढाल १५ हजार कोटी रुपयांची आहे. या उद्योगाची राज्यातील उलाढाल ५ हजार कोटींची असून, केवळ जालना परिसरात ३ हजार कोटींची उलाढाल होते. जालना जिल्ह्यात २० हजार शेतकरी बीजोत्पादनात कार्यरत असून, त्यांना वार्षिक सुमारे २५० कोटींचे निव्वळ उत्पन्न मिळत आहे. तसेच मजुरांना दरवर्षी १५० कोटींचा रोजगार मिळत आहे. त्यामुळे बियाणे उद्योगासमोरील अडचणी दूर करण्याबरोबरच पायाभूत सुविधांचा विकास करून बियाणे उत्पादन क्षेत्रात पोषक वातावरण निर्मिती करुन रोजगार आणि गुंतवणूक वाढीसाठी सीड पार्क उभारणीचा निर्णय महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे आगामी पाच वर्षांत जालना परिसरातील बियाणे उद्योगाची वार्षिक उलाढाल ३ हजार कोटींवरून ६ हजार कोटींपर्यंत, तर शेतक-यांच्या उत्पन्नात ४०० कोटींहून ६०० कोटींपर्यंत वाढ होणार आहे. बियाणे उद्योगाच्या वाढीचा दर वार्षिक १२ वरून १८ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Agriculture Department to setup Seed Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.