अवकाळीच्या नुकसानीला कृषी विभागाचा ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:06 AM2021-03-04T04:06:15+5:302021-03-04T04:06:15+5:30
सोयगाव : तालुक्यातील तीन गावात अवकाळी व गारपिटीसह झालेल्या पावसाने रब्बीच्या पिकांसह फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. यात ...
सोयगाव : तालुक्यातील तीन गावात अवकाळी व गारपिटीसह झालेल्या पावसाने रब्बीच्या पिकांसह फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. यात जरंडी, कंकराळा शिवारात गारपीट झाल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तरी देखील कृषी विभागाच्या वतीने येथील नुकसानीचे पंचनामे न करता महसूल प्रशासनाला तालुक्यात नुकसान निरंक असल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या या अहवालाने तालुक्यात खळबळ निर्माण झाली असून शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
गेल्या आठवड्यात सोयगाव मंडळातील जरंडी, कंकराळा, माळेगाव, पिंपरी, निंबायती या गावात अवकाळी पावसासह गारपिटीने पिकांना झोडपले. याबाबत तालुका महसूल विभागाने गारपिटीसह अवकाळी पाऊस झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला. याबाबत तालुका कृषी विभागाने नुकसानीची पाहणी न करताच अहवाल निरंक दिल्याची माहिती सोमवारी समोर आली.
अद्यापही तालुका कृषी विभागाने या पाच गावातील अवकाळीच्या नुकसानीची पाहणी केलेली नाही. महसूल विभागाला निरंक अहवाल देऊन कृषी विभाग नामानिर्माळा झाला आहे. त्यामुळे जरंडी, कंकराळा,निंबायती या तीन गावात नुकसान होऊन देखील अहवाल निरंक जातोच कसा असे गावकरी विचारू लागले आहेत.
-----
फोटो : सोयगाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसात आडव्या पडलेल्या ज्वारीचे पीक दुसऱ्या छायाचित्रात गहू पिकाचे झालेले नुकसान.