मराठवाड्यातील धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंचे आदेश
By बापू सोळुंके | Published: August 25, 2023 07:00 PM2023-08-25T19:00:52+5:302023-08-25T19:00:52+5:30
मराठवाड्यातील जालना, परभणी, औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात आतापर्यंत अत्यल्प पाऊस पडला आहे.
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली वगळता अन्य सहा जिल्ह्यात अत्यल्प आणि केवळ रिमझिम पाऊस झालेला आहे. मुसळधार पाऊस न पडल्यामुळे मराठवाड्यातील मोठ्या आणि मध्यम आणि लघू पाटबंधारे तलावात अत्यल्प जलसाठा उरला आहे. आगामी काळात पाऊस पडेल अथवा नाही, याविषयी शाश्वती नसल्याने मराठवाड्यातील सर्वच धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयात कृषी आढावा बैठकीनंतर मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की, मराठवाड्यातील जालना, परभणी, औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात आतापर्यंत अत्यल्प पाऊस पडला आहे. परिणामी या जिल्ह्यातील लहान,मोठ्या धरणांत अत्यल्प जलसाठा आहे. मराठवाड्यातील मोठ्या, मध्यम आणि लघू तलावात खूप कमी जलसाठा आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई तसेच पशुधनांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची परिस्थिती आज दिसत आहे. ही बाब विचारात घेऊन मराठवाड्यातील सर्वच धरणांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे कृषीमंत्री मुंंडे यांनी सांगितले.
मराठवाड्यातील धरणांची संख्या आणि आजचा जलसाठा
मोठी प्रकल्प- ११----------- ४२ टक्के
मध्यम प्रकल्प--७५----------२२टक्के
लघू पाटबंधारे प्रकल्प-----७४९------२१टक्के
गोदावरी नदीवरील बंधारे----१५-------------३६ टक्के
तेरणा, मांजरा आणि रेणा नदीवरील बंधारे---२७-----३३टक्के