अजिंठा लेणीत आग्या मोहोळाचा विदेशी पर्यटकांवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 07:42 PM2023-04-25T19:42:35+5:302023-04-25T19:42:47+5:30
अजिंठा येथील ९, १०, १९ आणि २६ या क्रमांकाच्या लेणींच्या माथ्यावर आग्या मोहोळ वास्तव करते.
सिल्लोड: जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत गेल्या एक महिन्यांपासून आग्या मोहोळाने पर्यटकांना बेजार केले आहे. दररोज एक दोन पर्यटकांना हे मोहोळ चावा घेत आहे. आज सकाळी देखील ५ ते ६ विदेशी व भारतीय पर्यटकांसह लेणी कर्मचाऱ्यांवर आग्या मोहोळाने हल्ला केला. सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
अजिंठा लेणी ही डोंगर माथ्यावर असल्याने दरवर्षी येथे लेणी क्रमांक ९, १०, २६ आणि १९ या लेणींच्या माथ्यावर आग्या मोहोळ वास्तव करते. पुरातत्व विभागामार्फत दर सोमवारी येथे धूर करून त्यांना पळवले जाते. मात्र, त्यातील काही मधमाशा पुन्हा परत येतात. आज सकाळपासून या क्षेत्रात येणारे पर्यटक डोक्याला रुमाल बांधून मधमाशापासून बचाव करत होते. मात्र, अचानक काही माशांनी ५ ते ६ पर्यटकांवर हल्ला केला. यात काही विदेशी पर्यटक देखील होते. जखमी पर्यटकांनी फरदापुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. तर काहींनी उपचार न घेता घरी जाणे पसंत केले. दरम्यान, पुरातत्व विभागाने आग्या मोहोळाचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी पर्यटकांतून होत आहे.
काढले तरीही आग्या मोहोळ परत येते
याबाबत पुरातत्व विभागाच्या एका कर्मचाऱ्यांने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, दर सोमवारी येथे कामगार धूर करून आग्या मोहोळ पळवतात. एकदा पुण्याहून मोहोळ काढणारा माणूस आणला होता. त्याने काढल्यानंतरही लेणीत पुन्हा मोहोळ परतले.