अहो आश्चर्यम्... औरंगाबादेत तिहेरी रेल्वेमार्ग आहे अन् आता चौथा मार्ग प्रस्तावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 07:51 PM2020-12-25T19:51:47+5:302020-12-25T19:54:19+5:30
Railway in Aurangabad राष्ट्रीय रेल्वे योजनेतील घोळ; मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे मार्गातून औरंगाबादचा पत्ता पुन्हा कट
औरंगाबाद : औरंगाबादेत तिहेरी रेल्वे मार्ग आहेत, हो तिहेरीच. आणि आता चौथा रेल्वे मार्गही प्रस्तावित आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण रेल्वे बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या नव्या राष्ट्रीय रेल्वे योजनेच्या (एनपीआर) मसुद्यात ही बाब नमूद करण्यात आली आहे. वर्षानुवर्षे दुहेरीकरणाची प्रतीक्षा करणाऱ्या मराठवाड्यात कागदोपत्री थेट तिहेरी रेल्वे मार्ग दाखविण्याची किमया रेल्वेने केली आहे.
मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर, सचिव प्रल्हाद पारटकर आणि स्वानंद सोळुंके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत या मसुद्यासाठी कन्सल्टन्सीने कागदोपत्री केलेले सर्वेक्षण आणि त्रुटींमुळे मराठवाड्यावर अन्याय झाल्याचे नमूद केले. बोरकर म्हणाले, रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी १६ डिसेंबर रोजी आगामी ३० ते ४० वर्षांचा ‘एनपीआर’ प्रसिद्ध केला. क्षमता असूनही यात मराठवाड्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ‘एनपीआर’मध्ये मागास भाग आणि औद्योगिक क्षेत्राशी कनेक्टिव्हिटी यासंदर्भातील माहितीत औरंगाबादला तिहेरी रेल्वे मार्ग असल्याचे आणि चौथा मार्ग प्रस्तावित असल्याचे नमूद केले आहे. एकेरी मार्ग असताना तिहेरी मार्ग दाखवून रेल्वेने जनतेची फसवणूक केली आहे. मल्टिमाॅडेल पॅसेंजर टर्मिनलविषयाच्या माहितीत प्रवाशांच्या संख्येनुसार पहिली २४ रेल्वेस्टेशन दाखविण्यात आले. यात औरंगाबादचा समावेश नाही. मात्र, बुलडाण्याचा आहे. तेथे स्थानकच नाही. तरीही २ लाखांहून अधिक प्रवासी दाखविण्यात आले.
रेल्वे अधिकाऱ्यांकडून खासदारांची फसवणूक
मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे मार्गाला औरंगाबाद, जळगाव या शहरांना वगळून दाखविण्यात आले आहे. हा मार्ग औरंगाबादमार्गे जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिकारी खासदारांना देतात आणि दस्तऐवजात मात्र औरंगाबादला वगळण्यात येते. याचा जाब खासदारांनी विचारला पाहिजे. शिवाय हा मार्ग २०५१ पर्यंत कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, अशीही माहिती बोरकर यांनी दिली.