अहो, ‘दख्खन का ताज’ पाहण्यासाठी ‘वेटिंग’; स्वातंत्र्यदिनी पर्यटकांच्या गर्दीचा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 01:29 PM2023-08-17T13:29:02+5:302023-08-17T13:29:14+5:30
तिकीट कक्षासमोर लांब रांग, कुटुंबासह पाहिले पुरातत्त्व स्थळांचे सौंदर्य
छत्रपती संभाजीनगर : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पर्यटनस्थळांवर मंगळवारी पर्यटकांनी एकच गर्दी केली. जिल्ह्यातील प्रत्येक पर्यटनस्थळ गर्दीने गजबजून गेले होते. शहरातील ‘दख्खन का ताज’ म्हणजे बीबी का मकबरा येथे तर पर्यटकांच्या गर्दीचा विक्रमच झाला. परिणामी, मकबरा पाहण्यासाठी पर्यटकांना इतर पर्यटक बाहेर पडण्याची वाट पाहावी लागत होती. गर्दीचे नियोजन करताना अधिकारी-कर्मचाऱ्यांची काहीशी दमछाक झाली.
पाणचक्की, औरंगाबाद लेणी येथेही पर्यटकांची मोठी गर्दी होती. पर्यटकांच्या गर्दीने पाणचक्की रोडवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढून पर्यटकांना पाणचक्की गाठावी लागली.
बीबी का मकबरा येथे तिकीट कक्षासमोरील रांग दूरपर्यंत गेली होती. तिकीट कक्षातून टोकण घेऊन मकबऱ्याच्या प्रवेशद्वारात जात नाही तर तेथेही लांब रांगेत उभे राहण्याची वेळ पर्यटकांवर ओढावत होती. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे संरक्षण सहायक संजय रोहणकर यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियोजन चोख ठेवले.
१४ टँकरच्या पाण्याने कारंजे सुरू
बीबी का मकबऱ्यातील कारंजे गेल्या काही दिवसांपासून बंद होते. मात्र, स्वातंत्र्य दिन आणि सलग सुट्यांच्या पार्श्वभूमीवर १४ टँकर मागवून हे कारंजे सुरू करण्यात आले. त्यामुळे पर्यटकांच्या आनंदात आणखी भर पडली.