धक्कादायकच,विद्यार्थ्यांकडे परीक्षेपूर्वीच थेट उत्तरपत्रिका; ग्रामीण केंद्रावर शहरवासीयांची सोय
By योगेश पायघन | Published: January 5, 2023 07:10 AM2023-01-05T07:10:29+5:302023-01-05T07:15:02+5:30
विद्यापीठाच्या पदवी परीक्षेतील धक्कादायक प्रकार;ॲडमिशन सोबत पासिंगची हमी ?
- योगेश पायघन
औरंगाबाद : पदवी परीक्षेत पेपर सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना उत्तरांची काॅपी मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सावंगी येथील अपेक्स महाविद्यालयात बीसीएसच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची काॅपी पर्यवेक्षकांनी पकडल्यावर त्याने या प्रकाराची कबुली दिली. उत्तराची काॅपी परीक्षेपूर्वीच सापडल्याचे त्याने स्वत: परीक्षा केंद्राकडे लिहूनही दिले. आलिशान वाहनातून आलेला युवक विद्यार्थ्यांच्या ‘सोयीसुविधे’वर विशेष लक्ष देत असल्याचा प्रकारही समोर आला.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ग्रामीण परीक्षा केंद्र असलेल्या अपेक्स महाविद्यालयात बीसीएस प्रथम वर्षाच्या प्रोग्रामिंग ऑफ स्टॅटेस्टिक आणि बी.एसस्सी.चा मायक्रोबायोलाॅजी १ आणि २ हा पेपर बुधवारी होता. बीसीएसचे सावंगीतील पद्मावती महाविद्यालय, अपेक्स महाविद्यालय आणि शहरातील सुप्रियाताई सुळे महाविद्यालयाचे १४९ विद्यार्थी परीक्षेसाठी होते, तर बी.एसस्सी.साठी हर्सूलमधील हरसिद्धी कला विज्ञान महाविद्यालय आणि जनता काॅलेजचे ९ विद्यार्थी परीक्षेला होते. प्रथम वर्ष पदवीच्या शेवटच्या पेपरची बैठक व्यवस्थेची तयारी सुरू होती.
गैरप्रकाराची खात्रीलायक माहिती मिळाल्यावर लोकमत प्रतिनिधीने बुधवारी १.३० वाजता अपेक्स महाविद्यालय गाठले. दुपारी १.४५ वाजता एक आलिशान कार काॅलेजशेजारी परीक्षा हाॅलजवळ येऊन थांबली. अवघ्या पाच मिनिटांत विद्यार्थ्यांनी त्या कारभोवती गराडा घातला. कारमधील युवकासोबत विद्यार्थ्यांनी चर्चा केल्यावर विद्यार्थी परीक्षा कक्षात गेले. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. मंझा यांच्या पथकाने केंद्रावर पाच परीक्षार्थ्यांचे पेपर पहिल्या तासाभरातच जमा केले. दरम्यान, कार निघून गेली. पथकाने परीक्षा केंद्र, परिसरातील व्हिडीओ, फोटो घेतले. या संबंधीचा अहवाल कुलगुरूंना सादर केल्यावर निर्देशानुसार पुढील कारवाई होईल, असे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले, तर विद्यापीठ प्रशासनाने या प्रकारावर शहानिशा केल्याशिवाय बोलण्यास नकार दिला.
ॲडमिशन सोबत पासिंगची हमी ?
ॲडमिशन सोबत पास करण्याचीही हमी देण्याचा हा प्रकार आहे. त्यासाठी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची विशेष सोय ठेवण्यात येत आहे. यावर परीक्षा मंडळ काय कारवाई करते तसेच परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांकडे उत्तरे आली कशी? जबाबदारांना शोधणार कसे याकडेही लक्ष लागले आहे.
परीक्षा मंडळाचे संचालक पोहोचले
ही माहिती मिळाल्यावर १.५० वाजता परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. गणेश मंझा यांचे पथक केंद्रावर पोहोचले. त्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच परीक्षा होईपर्यंत तेथे ठाण मांडले. दरम्यान, एका विद्यार्थिनीसह ३ काॅपीबहाद्दर विद्यार्थी आणि आपसात बोलणाऱ्या २ विद्यार्थिनींच्या उत्तरपत्रिका जमा करून महाविद्यालयाकडून अहवाल घेत पेपर संपल्यावर पथक रवाना झाले.
विद्यार्थ्याची दोन दिवसांपूर्वी कबुली
महाविद्यालयाबाहेर एक युवक येऊन परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी पुरवत असल्याने त्या युवकाला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तसे काही करत असल्याचा इन्कार केला होता. पथकाला घडलेल्या घटनेचा आणि परीक्षेपूर्वी हातावर उत्तरे लिहून परीक्षा हॉलमध्ये आलेल्या विद्यार्थ्याचा अहवाल पथकाला दिला आहे.
-राहुल पाटील, संचालक, अपेक्स महाद्यालय, सावंगी