‘एआय’ बनला चक्क डाॅक्टर; ‘एक्स-रे’ पाहून देतो काही क्षणांत रिपोर्ट
By संतोष हिरेमठ | Updated: January 29, 2025 14:18 IST2025-01-29T14:18:18+5:302025-01-29T14:18:54+5:30
५० ‘एक्स-रे’ झाल्यानंतर त्याचा एकत्रित डेटा या नव्या प्रणालीद्वारे मिळतो.

‘एआय’ बनला चक्क डाॅक्टर; ‘एक्स-रे’ पाहून देतो काही क्षणांत रिपोर्ट
संतोष हिरेमठ, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : एक्स-रे काढल्यानंतर त्याची फिल्म डाॅक्टरांना दाखवायची आणि त्यानंतर फिल्म पाहून नेमके कुठे फ्रॅक्चर आहे, दाताची स्थिती काय आहे, याचे निदान डाॅक्टर करतात. मात्र, छत्रपती संभाजीनगरातील शासकीय दंत महाविद्यालयात आता एक्स-रे काढल्यानंतर अवघ्या काही क्षणांत, अगदी डाॅक्टरांच्याही आधी रुग्णाला नेमके काय झाले आहे, याचे निदान ‘एआय’ म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स करीत आहे.
रुग्णांच्या वेदनांचे निदान वेगाने होण्यास मदत होणार
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक असे ‘एक्स-रे विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ ही मशीन दाखल
झाली आहे. नेहमीच्या एक्स-रे मशीनपेक्षा ही मशीन अगदी वेगळी आणि प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आहेत. रुग्णांच्या वेदनांचे निदान वेगाने होण्यास मदत होणार असून, यामुळे शासकीय दंत महाविद्यालय उपचार आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुढच्या पायरीवर पोहोचले आहे.
‘एक्स-रे विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे एक्स-रे काढल्यानंतर तत्काळ अहवालही (रिपोर्ट) येतो. त्यातून रुग्णाला नेमके काय झाले आहे, याचे निदान होते. शिवाय एक्स-रेचा एकत्रित डेटाही यामध्ये राहतो.
डाॅ. माया इंदूरकर, अधिष्ठाता
सेकंदांत अचूक निष्कर्ष
जुन्या पद्धतीत एक्स-रे घेण्यासाठी जास्त वेळ लागतो. परंतु, ‘एआय’च्या मदतीने आता ‘एक्स-रे’ची संपूर्ण प्रक्रिया सुलभ
झाली आहे. एक्स-रे मशीनमधून मिळालेली छायाचित्रे थेट एआय प्रणालीकडे जाते. ही प्रणाली काही सेकंदांत इमेज प्रोसेसिंग करून अचूक निष्कर्ष देते. या रिपोर्टमध्ये हाडे, दात आणि इतर सूक्ष्म तपशील स्पष्टपणे समजण्यास मदत होते. त्यामुळे निदान अधिक अचूक होते आणि उपचार जलद सुरू करता येतात.