'ज्याला घरातूनच बाहेर काढलं, त्याला काय उत्तर द्यायचं'; ओवैसींची राज ठाकरेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 08:54 PM2022-05-12T20:54:46+5:302022-05-12T21:08:25+5:30
देशात आज द्वेषपूर्ण भाषेचा वापर केला जात आहे, मात्र अकबरुद्दीन ओवैसी द्वेषाचं उत्तर द्वेषाने नाही तर प्रेमाने देईल, असंही अकबरुद्दीन ओवैसी यांनी सांगितले.
औरंगाबाद- कुत्रे भुंकत आहेत, भुंकणाऱ्या कुत्र्यांना भुंकू द्या. कुत्रे भुंकत असतात. पण, वाघ शांतपणे निघून जात असतो. ते जाळं विणत आहेत, तुम्ही त्यात फसायचं नाही. आपण कायदा हातात घ्यायचा नाही, असं एमआयएमचे आमदार आणि नेते अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले. त्यांनी आज औरंगाबादमधील जनेतला संबोधित केले. आपल्या भाषणाच्या शेवटी हिंदुस्तान झिंदाबाद असे म्हणत, हा देश जेवढा तुमचा आहे, तेवढाच आमचाही आहे, म्हटले. या देशात आपण प्रेमानं राहूयात, असेही अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले.
अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले की, मी येथे कोणाला उत्तर द्यायला आलो नाही. मी कोणाला वाईट बोलायला आलो नाहीय. तसं करण्याची मला गरज देखील नाही. आमचा तर एक खासदार आहे. तुम्ही तर बेघर आहे. तुम्हाला काय उत्तर देणार. ज्याला घरातून बाहेर काढलं आहे, त्याला काय उत्तर द्यायचं, असं अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले.
देशात आज द्वेषपूर्ण भाषेचा वापर केला जात आहे, मात्र अकबरुद्दीन ओवैसी द्वेषाचं उत्तर द्वेषाने नाही तर प्रेमाने देईल, असंही अकबरुद्दीन ओवैसी यांनी सांगितले. तसेच कुणाला घाबरण्याची गरज नाही. ज्याला कुणाला वाटत असेल आम्ही घाबरू पण ऐकून घ्या, आम्ही घाबरणार नाही. इस्लाम आधी संपला नाही, मग आता कोण संपवणार?, असा सवाल करत अकबरुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
दरम्यान, अजानचा विषय आहे, मॉब लिंचींगचा आहे, हिबाजचा विषय आहे. मात्र, आम्ही कुणालाही घाबरत नाही. औरंगाबाद ही अल्लाहची सरजमीन आहे. जर वेळच आली तर, जीवाची बाजी लावू आणि मरणाऱ्यांच्या यादीत सर्वात पुढे अकबरुद्दीन ओवैसी असेल, असे म्हणत औरंगाबादमधील जनतेला न घाबरण्याचे आवाहन औवेसी यांनी केलं.
ओवैसींने घेतले औरंगजेब याच्या कबरीचे दर्शन
अकबरुद्दीन औवेसी यांनी आज दुपारी खुलताबाद येथील विविध दर्गेला भेट देवून दर्शन घेतले. मात्र, त्यांनी यावेळी औरंगजेब याच्या कबरीचे दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, आजवर कोणीच या कबरीचे दर्शन घेतले नाही, मात्र एमआयएमच्या नेत्यांनी दर्शन घेऊन नवीन राजकारणाची पद्धत रूढ करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.