एअर इंडियाची मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमानसेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 09:21 AM2020-09-23T09:21:56+5:302020-09-23T09:23:07+5:30
एअर इंडियाने मुंबईसाठी २२ सप्टेंबरपासून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेत वेळापत्रकही जाहीर केले असून आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी एअर इंडियाचे विमान उड्डाण घेईल.
औरंगाबाद : मोठ्या प्रतिक्षेनंतर तब्बल सहा महिन्यानंतर एअर इंडियाची मुंबई - औरंगाबाद - मुंबई विमानसेवा अखेर मंगळवार दि. २२ सप्टेंबरपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी या विमानाने मुंबईहून २९ प्रवासी शहरात दाखल झाले, तर ४७ प्रवासी औरंगाबादहून मुंबईला रवाना झाले, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल ६ महिन्यांनंतर औरंगाबादला मुंबईची हवाई कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. मुंबईहून सायंकाळी ६ वाजता उड्डाण घेतल्यानंतर औरंगाबाद विमानतळावर सायंकाळी ७ वाजता हे विमान दाखल झाले. त्यानंतर रात्री ८.०६ वा. या विमानाने औरंगाबादहून मुंबईसाठी उड्डाण घेतले. औरंगाबादहून दिल्ली, हैदराबाद विमानसेवा सुरू झाल्यानंतर मुंबईची विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा केली जात होती. इंडिगोकडूनही आता मुंबई- औरंगाबाद- मुंबई सेवा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. एअर इंडियाने मुंबईसाठी २२ सप्टेंबरपासून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेत वेळापत्रकही जाहीर केले असून आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी एअर इंडियाचे विमान उड्डाण घेईल.