शिर्डीच्या नव्या विमानतळावरील हवाई सेवेने औरंगाबाद विमानतळावरील विमानसेवेला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:33 PM2017-09-25T12:33:02+5:302017-09-25T12:34:46+5:30
शिर्डीच्या नव्या विमानतळावरील हवाई सेवेने चिकलठाणा विमानतळावरील विमानसेवा आणि प्रवासी संख्येत घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी शहरातील हॉटेल्स, टूर्स, ट्रॅव्हल्सच्या व्यवसायालाही फटका बसणार आहे.
औरंगाबाद, दि. २५ : शिर्डीच्या नव्या विमानतळावरील हवाई सेवेने चिकलठाणा विमानतळावरील विमानसेवा आणि प्रवासी संख्येत घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी शहरातील हॉटेल्स, टूर्स, ट्रॅव्हल्सच्या व्यवसायालाही फटका बसणार आहे.
शिर्डी येथील विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने २१ सप्टेंबरला सार्वजनिक वापराचे विमानतळ म्हणून अधिकृत ‘एअरोड्रम’ परवाना जारी केला. त्यामुळे साई भक्तांची सोय होणार आहे; परंतु अवघ्या ११० कि.मी. अंतरावरील या विमानतळामुळे औरंगाबादच्या विमानतळावर आगामी काळात परिणाम होऊ शकतो.चिकलठाणा विमानतळावरून सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले गेले.
ट्रूजेटच्या विमानाने तिरुपतीला जाणा-या आणि दक्षिणेतून शिर्डी दर्शनासाठी येणा-या भाविकांची संख्या मोठी आहे. प्रत्येक दिवशीचे विमान प्रवाशांनी भरून जाते. या विमानाने औरंगाबादला आल्यानंतर प्रवाशांना ट्रॅव्हल्सने शिर्डीला ये-जा करावी लागते. त्यासाठी मोठा खर्च होतो. हा खर्च वाचविण्यासाठी ही विमानसेवा औरंगाबादऐवजी हैदराबाद-शिर्डी अशी थेट होऊ शकते.
दिल्लीवरून येणा-या एअर इंडियाच्या विमानातून ३० ते ४० टक्के प्रवासी शिर्डीला जाण्यासाठी येतात. दिल्ली-शिर्डी विमानसेवेमुळे प्रवासी औरंगाबादला वळसा घालणे टाळू शकतात. शिर्डीसाठी येणारे प्रवासी औरंगाबादेत हॉटेलमध्ये अनेकदा मुक्काम करतात. येथून खाजगी वाहनांनी शिर्डीला जातात. नव्या विमानतळाचा या व्यवसायावर फरक पडेल.ट्रूजेटच्या व्यवस्थापकीय संचालकांशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाइल उचलला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.
पाठपुरावा करू
शिर्डी विमानतळामुळे औरंगाबादवर परिणाम होईल, असे वाटत नाही. या विमानतळामुळे औरंगाबादचे एखादे विमान बंद होणार असेल तर ‘सीएमआयए’ तसे होऊ देणार नाही. औरंगाबादेत आल्यावर भाविक थेट शिर्डीला जातात. त्यामुळे शहरातील हॉटेल्सवर फारसा फरक पडणार नाही.
-प्रसाद कोकीळ, अध्यक्ष, चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रिज अॅण्ड अॅग्रिकल्चर (सीएमआयए)
निश्चित परिणाम
शिर्डी विमानतळ विकसित होणार आहे. औरंगाबादला येऊन शिर्डीला वाहनांनी जाण्याऐवजी प्रवासी थेट विमानाने जातील. त्यामुळे आगामी कालावधीत त्याचा औरंगाबादवर निश्चित परिणाम होईल.
-अब्दुल अजीज, व्यावसायिक, टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स