वायुप्रदूषण मोजणारी बनवली सेन्सरचिप, ब्रिटन सरकारकडून पेटंट मंजूर
By राम शिनगारे | Published: May 9, 2024 05:27 PM2024-05-09T17:27:55+5:302024-05-09T17:28:13+5:30
या सेन्सरचिपचे वैशिष्ट्य असे की, बोटाच्या टोकावर बसेल इतक्या छोट्या स्वरूपात चार सेन्सर यशस्वीरीत्या एकत्रित तयार केले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : जगभरातील महत्त्वाच्या शहरांतील वायुप्रदूषण वाढून ते अगदी विषारी पातळीवर पोहचले आहे. सर्वसामान्य व्यक्तीला हवेतील प्रदूषण मोजण्यासाठी सहज बाळगता येईल, अशी सेन्सरचिप डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक विभागात कार्यरत असताना एका युवा संशोधकाने तयार केली आहे. या संशोधनासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संस्थेच्या (आयआयएससी) मदतीचा हात दिला असून, त्यास ब्रिटन सरकारने नुकतेच पेटंट मंजूर केले आहे. भारत सरकारकडे पेटंटसाठी प्रस्ताव दाखल असून, त्यावर प्रक्रिया सुरू आहे.
कन्नड तालुक्यातील हस्ता येथील संशोधक डॉ. प्रमोद भैयासाहेब शिंदे यांना बंगळुरू येथील 'आयआयएससी' संस्थेकडून २०२० साली एक संशोधन प्रकल्प मंजूर केला होता. डॉ. शिंदे हे २०२० साली संशोधन प्रकल्प मिळविणारे राज्यातील एकमेव संशोधक होते. या प्रकल्पानुसार डॉ. शिंदे यांनी ‘हेक्सा प्लेक्सड माइक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टम (एमईएमएस) सेमिकंडक्टर चिप मायक्रोहीटर बूस्ट मल्टिगॅस डिटेक्शन व्हाया थर्मल मॉड्युलेशन’ हे नावीन्यपूर्ण डिझाइन तयार केले. हे डिझाइन एक स्मार्ट सेन्सरचिप असून, त्याचा वापर वायुप्रदूषण मोजण्यासाठी केला जातो. या मायक्रोचिपचे उत्पादन व चाचण्या आयआयएससी संस्थेत केल्या आहेत.
सध्याचे वायुप्रदूषण हे आरोग्यास हानिकारक ठरत असून, ग्लोबल वाॅर्मिंगसंदर्भातील वेगवेगळे अहवाल चिंताजनक आहेत. त्या पार्श्वभूमीवर एक उपाय म्हणून हे संशोधन पर्याय देत आहे. या सेन्सरचिपचे वैशिष्ट्य असे की, बोटाच्या टोकावर बसेल इतक्या छोट्या स्वरूपात चार सेन्सर यशस्वीरीत्या एकत्रित तयार केले आहेत. त्यामुळे आगामी काळात हे संशोधन जगभरातील संशोधक, कंपन्यांसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे संशोधक डॉ. प्रमोद शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. डॉ. शिंदे हे सध्या पुणे येथील भारतीय हवामान विभागात शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मागील महिन्यातच त्यांना अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाने मशीन लर्निंग कोर्स पूर्ण केल्याबद्दल सन्मानित केले आहे.
सहा लाख रुपयांत तयार झाली सेन्सरचिप
वायुप्रदूषण मोजणारी सेन्सरचिप एक सेंटिमीटर बाय ०.७ सेंटिमीटर एवढ्या छोट्या आकाराची आहे. ही सेन्सरचिप बनविण्यासाठी सहा लाख रुपये खर्च आला आहे. सेन्सरचिपच्या माध्यमातून अमोनिया, कार्बन मोनोक्साइड, सफ्लरडाय ऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड, नायट्रोजनडाय ऑक्साइड, बेन्झीन, झायलिन, टॉल्वीन आदी वायूंचे हवेतील प्रमाण मोजता येत आहे. त्यानुसार हवेतील प्रदूषणाची पातळी कुठपर्यंत पोहचते हेसुद्धा समजते.