सिंगापूर, बँकाॅकसाठी छत्रपती संभाजीनगरातून ‘हवा हवाई’; एअर एशिया घेणार ‘टेकऑफ’
By संतोष हिरेमठ | Updated: March 27, 2024 19:30 IST2024-03-27T19:27:33+5:302024-03-27T19:30:50+5:30
मलेशियातील एअर एशिया विमान कंपनीने या वर्षअखेरपर्यंत देशातील सहा शहरांमधून उड्डाण सुरू करण्याचे नियोजन काही दिवसांपूर्वी केले आहे.

सिंगापूर, बँकाॅकसाठी छत्रपती संभाजीनगरातून ‘हवा हवाई’; एअर एशिया घेणार ‘टेकऑफ’
छत्रपती संभाजीनगर : शहरातून लवकरच एअर एशिया विमान कंपनीकडून सिंगापूर आणि बँकॉक या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. विमानतळ प्राधिकरणाची यासंदर्भात कंपनीसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरातून थेट सिंगापूर, बँकॉकसाठी विमान उपलब्ध झाल्यास पर्यटन आणि उद्योगाचे ‘टेकऑफ’ होण्यास चालना मिळणार आहे.
मलेशियातील एअर एशिया विमान कंपनीने या वर्षअखेरपर्यंत देशातील सहा शहरांमधून उड्डाण सुरू करण्याचे नियोजन काही दिवसांपूर्वी केले आहे. या ६ शहरांमध्ये जयपूर, विशाखापट्टणम, अहमदाबाद, पाटणा, कालिकत आणि छत्रपती संभाजीनगरचा समावेश असल्याचे समोर आले आहे. एअर एशियाकडून क्वालालंपूर-मलेशिया, तसेच सिंगापूर, बँकाॅकसाठी विमानसेवा सुरू करण्याची शक्यता आहे. चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीशी प्राथमिक चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात लवकरच अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे.
'इमिग्रेशन'ची प्रतीक्षा
विमानतळाला 'कस्टम'ची सुविधा मिळालेली आहे. मात्र, 'इमिग्रेशन'च्या सुविधेची अद्याप प्रतीक्षा आहे. यासंदर्भात गेल्या अनेक वर्षांच्या कालावधीपासून ‘इमिग्रेशन’साठी प्राधिकरणाकडून संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला. आता लवकरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली इमिग्रेशनची सुविधा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या दृष्टीने चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाकडून पाठपुरावा सुरू आहे.