जगभरातील माेठ्या विमानांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:06 AM2021-01-25T04:06:01+5:302021-01-25T04:06:01+5:30
धावपट्टी विस्तारीकरणाचा फायदा : आंतरराष्ट्रीय विमान, कार्गोसेवा, हवाई कनेक्टिव्हिटी, प्रवासी वाढीला मिळेल बळ औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या ...
धावपट्टी विस्तारीकरणाचा फायदा : आंतरराष्ट्रीय विमान, कार्गोसेवा, हवाई कनेक्टिव्हिटी, प्रवासी वाढीला मिळेल बळ
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाला गती दिली जात आहे. सध्याच्या धावपट्टीचा विस्तार झाल्यानंतर जगातील सर्वांत मोठी विमाने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोईंग-७७७, बोईंग-७५७ यांसारख्या विमानांचेही औरंगाबादेत लॅण्डिंग शक्य होईल. त्यातून आंतरराष्ट्रीय विमान, कार्गोसेवा, हवाई कनेक्टिव्हिटी आणि प्रवासी वाढीला बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी १८ जानेवारीपासून भूसंपादनाच्या अनुषंगाने मोजणीला सुरुवात करण्यात आली. विमानतळाची एअर टर्मिनलची इमारत ही आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. सध्याची विमानतळाची धावपट्टी ही मध्यम आकाराच्या विमानांसाठी योग्य आहे. परंतु मोठ्या विमानासाठी धावपट्टीचे विस्तारीकरण आवश्यक आहे. यासाठी विमानतळ प्राधिकरणाने पाठपुरावा केला. अखेर १८२ हेक्टर जागा भूसंपादीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. विस्तारीकरणाचे काम लवकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उद्योगाला फायदा
विमानतळ विस्तारामुळे दिल्ली, मुंबई औद्योगिक कॉरिडोर (डीएमआयसी) प्रकल्पात विकसित करण्यात येत असलेल्या शेंद्रा-बिडकीन औद्योगिक वसाहतीच्या विकासास मोठ्या प्रमाणावर साह्यभूत होणार आहे. त्याबरोबरच औरंगाबादच्या पर्यटन विकासातही वाढ होण्यास मदत होणार आहे.
पॅरलल टॅक्सी वे, इतर सुविधा
धावपट्टी विस्तारीकरणासह समांतर टॅक्सी वे आणि इतर सुविधांची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी डीपीआर तयार करण्यात येणार आहे. मुंबई विमानतळावर जागेअभावी काही विमाने अन्य विमानतळांवर उतरवावी लागतात. त्या तुलनेत औरंगाबाद मुंबईपासून जवळ आहे. त्यामुळे मुंबईत विश्रांतीसाठी येणारी विमाने औरंगाबादेत उतरवली जाऊ शकतात.
डीपीआर होईल तयार
विस्तारीकरणामुळे सध्याची धावपट्टीची लांबी वाढेल. बोईंग-७७७, बोईंग-७५७ यांसारख्या मोठ्या विमानांना मोठा रन वे लागतो. त्यामुळे धावपट्टीचा विस्तार झाल्यानंतर अशी मोठी विमाने आपल्याकडे येणे शक्य होतील. भूसंपादन झाल्यानंतर विकासासंदर्भात डीपीआर तयार होईल.
- डी. जी. साळवे, संचालक, चिकलठाणा विमानतळ
--
धावपट्टीची स्थिती
सध्याची धावपट्टी - ९,३०० फूट म्हणजे २,८३५ मीटर
धावपट्टीचा विस्तार-१२,००० फूट.