विमानसेवा कधी हवेत, कधी जमिनीवर; औरंगाबादला विमान कंपन्या फिरवतात ‘गोल गोल’

By संतोष हिरेमठ | Published: July 27, 2022 11:37 AM2022-07-27T11:37:51+5:302022-07-27T11:38:33+5:30

आता सायंकाळी उड्डाण घेणारे दिल्ली- औरंगाबाद- दिल्ली विमान ३० जुलैपासून बंद करण्याचा निर्णय इंडिगोने घेतला आहे.

Airlines service sometimes in the air, sometimes on the ground; Airlines companies mischief with Aurangabad | विमानसेवा कधी हवेत, कधी जमिनीवर; औरंगाबादला विमान कंपन्या फिरवतात ‘गोल गोल’

विमानसेवा कधी हवेत, कधी जमिनीवर; औरंगाबादला विमान कंपन्या फिरवतात ‘गोल गोल’

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद :
विमान कंपन्या औरंगाबादला ‘गोल गोल’ फिरवत असल्याची परिस्थिती आहे. सुरू केलेली विमानसेवा अचानक बंद केली जाते. आता सायंकाळी उड्डाण घेणारे दिल्ली- औरंगाबाद- दिल्ली विमान ३० जुलैपासून बंद करण्याचा निर्णय इंडिगोने घेतला आहे. पुरेशी प्रवासीसंख्या नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे औरंगाबादहून एक विमान कमी होणार आहे. परिणामी, दिल्लीहून महिन्याकाठी येणाऱ्या ३ हजार प्रवाशांची संख्या घटणार असून, पर्यटन, उद्योग क्षेत्रासह औरंगाबादच्या हवाई कनेक्टिव्हिटीला याचा फटका बसणार आहे.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २ जुलैपासून सकाळच्या वेळेत आठवड्यातून तीन दिवसांसाठी दिल्लीसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली होती; परंतु ही विमानसेवाही गेल्या काही दिवसांपासून अचानक बंद करण्यात आली. त्यानंतर सायंकाळचे दिल्लीचे विमान बंद करून ३० जुलैपासून दररोज सकाळी उड्डाण करण्याचा निर्णय १२ जुलै रोजी घेण्यात आला होता. त्यातही आता अचानक बदल करून १ ऑगस्टपासून इंडिगोने केवळ आठवड्यातून तीन दिवस सकाळच्या वेळेत उड्डाण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे एक ऑगस्टपासून औरंगाबादहून एक विमानसेवा कमी होणार आहे.

किती प्रवाशांची ये-जा ?
इंडिगोच्या सध्याच्या सायंकाळच्या १८० आसन क्षमतेच्या विमानाने दिल्लीहून रोज जवळपास १०० प्रवासी शहरात दाखल होतात. त्यानुसार महिन्याकाठी ३ हजार प्रवासी औरंगाबादेत येणे यापुढे थांबणार आहे.

विमानतळाचे अधिकारी म्हणाले...
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे म्हणाले, ऑपरेशन रिजनमुळे सेवेसंदर्भात विमान कंपन्या निर्णय घेत असतात. विमानसेवा पुन्हा पूर्ववत होईल. इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही.

नव्या कंपन्यांवर परिणाम
इंडिगोचे दिल्लीचे सायंकाळचे विमान ३० जुलैपासून बंद केले जाणार आहे. सकाळी नियमित उड्डाण घेईल, असे सांगण्यात येते; परंतु दिल्लीची विमानसेवा ऑगस्टमध्ये आठवड्यातून केवळ तीन दिवस सध्या दाखवीत आहे. याचा पर्यटन क्षेत्रावर परिणाम होईल. नव्या कंपन्या औरंगाबादेत येण्याचे धाडस करणार नाही.
- आशुतोष बडवे, अध्यक्ष ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ औरंगाबाद

तिकीट दर, वेळेचा परिणाम
ऑगस्टपासून इंडिगोचे दिल्ली विमान हे सकाळच्या सत्रात सुरू राहील. सध्याचे सायंकाळचे विमान बंद होईल. हे सकाळचे विमान आठवड्यातून दररोज उड्डाण घेण्याऐवजी तीनच दिवस असेल. तिकिटाचे वाढीव दर आणि विमानाची वेळ, हे घटलेल्या विमान प्रवासी संख्येचे कारण आहे.
- अक्षय चाबूकस्वार, सदस्य, औरंगाबाद एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रूप

Web Title: Airlines service sometimes in the air, sometimes on the ground; Airlines companies mischief with Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.