आमच्याकडून एक टपरी हटत नाही,तुम्ही झाडे तोडायला सांगतात; दानवेंचं अधिकाऱ्यांना अजब उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 10:30 AM2020-01-19T10:30:02+5:302020-01-19T10:37:48+5:30
दानवे यांनी वेळ नसल्याचे म्हणत पुढचा विषय घेण्यास सांगितला. तसेच शिर्डी, वेरूळ, अजिंठा रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटीवर बोलण्याचे सुद्धा टाळले.
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी विमानतळ सल्लागार समितीची बैठक झाली. तर विमानतळ परिसरात वाढलेल्या झाडांमुळे विमानांना अडथळ निर्माण होत असून त्यांची छाटणी करणे गरजेचे असल्याचा प्रश्न विमानतळ अधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता. मात्र 'आमच्याकडून एक टपरी हटत नाही, तुम्ही झाडे तोडायला सांगतात' असे अजब उत्तर विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष व भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी दिल्याने अधिकारी आश्चर्यचकित झाले.
या बैठकीत विमानतळाचे अनेक प्रश्न मांडले जाणार होते. मात्र, वेळ नसल्याचे म्हणत विमानतळाच्या पाण्याच्या समस्येसह अनेक प्रश्नांना समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बगल दिली. माझ्याशी संबंधित विषय घ्या म्हणत. संबंधित विषयांवर त्या-त्या प्रशासनाबरोबर चर्चा करण्याचे सांगून बैठक आटोपती घेतली. परिणामी, अनेक विषयांवर चर्चाच झाली नाही.
विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी विमानतळाच्या आतापर्यंत झालेल्या सुविधांविषयी आणि प्रश्नांविषयी माहिती दिली. महापालिकेकडून पुरेसे पाणी मिळत नाही, असे म्हणत असतानाही दानवे यांनी वेळ नसल्याचे म्हणत पुढचा विषय घेण्यास सांगितला. तसेच शिर्डी, वेरूळ, अजिंठा रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटीवर बोलण्याचे सुद्धा टाळले.
विमानतळावर उतरणाऱ्या विमानांना उंच झाडांचा अडथळा होत आहे. वैमानिकांकडून तक्रारी होत आहेत. ही झाडे पूर्ण नाही, पण त्याची छाटणी करणे गरजेचे असल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी म्हटले. विस्तारीकरणासाठी जमीन मिळेल. तेव्हा हा प्रश्न सुटेल. आमच्याकडून एक टपरी हटत नाही, तुम्ही झाडे तोडायला सांगतात, असे दानवे म्हणाले.
दुबईला जाता येईल १० हजारांत
दुबईच्या कनेक्टिंग फ्लाईटसाठी कस्टमची सुविधा मिळाली आहे. परंतु इमिग्रेशनसाठी अजून परवानगी मिळालेली नाही. त्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. हे जर झाले तर थायलंड, दुबईला विमानसेवेचा मार्ग मोकळा होईल. तर १० हजार रुपयांत दुबईला जाता येईल, असे रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले.