छत्रपती संभाजीनगरात विमानतळाच्या विस्तारीकरणाला लवकरच मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 01:23 PM2024-08-28T13:23:57+5:302024-08-28T13:25:41+5:30
१३९ एकर जमिनीच्या संपादनासाठी ३२.३० कोटींचा निधी देण्यात आला आहे
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाला लवकरच मुहूर्त मिळणार आहे. राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी सोमवारी शासन निर्णयाद्वारे ६८.२५ कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली. यात चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक १३९ एकर जमिनीच्या भूसंपादनासाठी ३२.३० कोटींचा निधी देण्यात आला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रेंगाळलेला भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी शासनाने ४५५ कोटींची तरतूद केली आहे. त्यातील ६८.२५ कोटी रुपये सोमवारी (दि.२६) अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित केले. त्यात चिकलठाणा विमानतळासाठी ३२.३० कोटी, गोंदिया विमानतळासाठी ५.९५ कोटी, कराड विमानतळासाठी २० कोटी आणि विविध विमानतळांच्या सोयी सुविधांसाठी १० कोटी असे एकूण ६८.२५ कोटी रुपये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरित करण्यास मान्यता देण्यात आली.
१४७ एकर जागेत विस्तारीकरण, ८ एकर क्षेत्र प्राधिकरणाचे
गेल्या अनेक वर्षांपासून विमानतळाच्या विस्तारीकरणाची प्रतीक्षा केली जात आहे. यासाठी आधी १८२ एकर जागेच्या भूसंपादनाची प्रतीक्षा केली जात होती. जागेची मोजणीही झाली होती; परंतु नंतर १४७ एकर जागेचे भूसंपादन करण्याचा निर्णय झाला. यातील ८ एकर क्षेत्र हे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिपत्त्याखालीच आहे. त्यामुळे १३९ एकर क्षेत्र संपादित करावे लागेल. या १३९ एकर भूसंपादनासाठी निधीची प्रतीक्षा केली जात होती. अखेर निधीचा मार्ग मोकळा झाल्याने विस्तारीकरणाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.
विस्तारीकरणात काय-काय होणार?
- चिकलठाणा विमानतळाची धावपट्टी सध्या ९ हजार ३०० फूट म्हणजेच २८३५ मीटर लांबीची आहे. विस्तारीकरणात १२ हजार फुटांची म्हणजे ३६६० मीटर होईल.
- धावपट्टी विस्ताराने भविष्यात विमानतळावर कार्गो विमाने, तसेच जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या जम्बो विमानांची उड्डाणे शक्य होतील.
- विमानतळावर विमानाची वाहतूक सुरळीत होण्यासाठी समांतर ‘टॅक्सी वे’ आवश्यक असते. धावपट्टीचा विस्तारासह समांतर ‘टॅक्सी वे’देखील विस्तारीकरणात होईल.
- विमानांची पार्किंग व्यवस्था, नवीन इमारत