विमानतळ रुंदीकरणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:02 AM2021-07-17T04:02:07+5:302021-07-17T04:02:07+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणासाठी १८२ एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. तालुका ...
औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणासाठी १८२ एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे.
तालुका भूमी अभिलेख आणि नगर भूमापन विभागाने सर्व मोजण्या पूर्ण केल्या असून, महिनाअखेर मोजणी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाईल, अशी माहिती भूमापन कार्यालयाने दिली आहे.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मंजुरीनंतर भूसंपादनाची मोहीम सुरू केली जाणार आहे. चिकलठाणा गावठाणातील तब्बल २५० मालमत्ता बाधित होणार आहेत.
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचा १२ हजार फुटांपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. सध्या धावपट्टीची लांबी ९ हजार ३०० फूट एवढी आहे. त्यामुळे उर्वरित २ हजार ७०० फुटांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
भूमि अभिलेख कार्यालयाकडून १८२ पैकी १५० एकर जमिनीच्या मोजणी करण्यात आली आहे. या मोजणीचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे.
विस्तारीकरणात बाधित होणाऱ्या मालमत्तांवर नगर भूमापन विभागाने जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या सूचनेनुसार मार्किंगदेखील केली आहे.
चौकट...
महिनाअखेर जाणार अहवाल
याबाबत माहिती देताना नगर भूमापन अधिकारी गणेश सोनार यांनी सांगितले की, या महिनाअखेर मोजणी अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल. तसेच जिल्हा भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक दुष्यंत कोळी यांनीदेखील सोबतच अहवाल सादर केला जाणार असल्याचे सांगितले.