अजिंठा कलाजागर महोत्सव उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:04 AM2021-01-03T04:04:21+5:302021-01-03T04:04:21+5:30
सोयगाव : जगप्रसिद्ध अजिंठालेणी घडविणाऱ्या अनामिक कलावंतांना समर्पित असलेला अजिंठा कलाजागर महोत्सव नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी यक्षयात्री परिसरात उत्साहात ...
सोयगाव : जगप्रसिद्ध अजिंठालेणी घडविणाऱ्या अनामिक कलावंतांना समर्पित असलेला अजिंठा कलाजागर महोत्सव नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी यक्षयात्री परिसरात उत्साहात संपन्न झाला. महोत्सवात राज्यभरातून ४५ कलावंतांची उपस्थिती होती.
अजिंठा कला जागर महोत्सव ज्येष्ठ कलावंत प्राचार्य राजेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडला. यावेळी कलाध्यापक शालिग्राम भिरुड, एन. ओ. चौधरी, प्राचार्य अतुल मालखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात अजिंठालेणी घडविणाऱ्या अनामिक कलावंतांना स्मरून व ज्येष्ठ कलावंत स्व. तांबटकर यांना श्रद्धांजली अर्पित करून करण्यात आली. दरम्यान, या महोत्सवात राष्ट्रीय सन्मान पुरस्कृत शिल्पकार रमाकांत सूर्यवंशी, कालिदास राष्ट्रीय कला सन्मान पुरस्कृत चित्रकार शरद भारती, शाम कुमावत, संतोष साळवे, जागतिक कला पुरस्कृत चित्रकार शुभम बाविस्कर या नामवंत कलावंतांचा सत्कार करण्यात आला, या महोत्सवास राज्यभरातील ४५ नामांकित कलावंतांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी त्रिमूर्ती आर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुशील चौधरी, चित्रकार निरंजन शेलार, कलाध्यापक परशुराम पवार, प्रताप कुमावत, पक्षी तज्ज्ञ विक्रम पाटील, आदींनी परिश्रम घेतले.
चौकट-
ज्येष्ठ कलावंत तांबटकर यांनी सुरू केला महोत्सव
नववर्षाची सुरुवात कलेच्या पंढरीत म्हणजेच अजिंठा लेणीत व्हावी या उद्देशाने ज्येष्ठ कलावंत स्वर्गीय प्रकाश तांबटकर यांनी अजिंठा लेणीच्या सान्निध्यात यक्षयात्रीचा पुतळा उभारून अजिंठा कलाजागर महोत्सवाला सुमारे २० वर्षांपूर्वी सुरुवात केली होती. तेव्हापासून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारीला दरवर्षी अजिंठा कलाजागर महोत्सव साजरा करण्यात येतो. तांबटकर यांच्या निधनानंतर हा महोत्सव काही काळ बंद पडला होता. मात्र, त्यांच्या शिष्यांनी गुरूंची ही परंपरा सुरू राहावी या उद्देशाने त्रिमूर्ती आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून तो पुन्हा सुरू केला.
छायाचित्र ओळी- अजिंठा कलाजागर महोत्सवात अनामिक कलावंतांना नमन करण्यासाठी यक्षयात्री पुतळ्याजवळ उपस्थित कलावंत.