वेरूळ, अजिंठा लेण्यांच्या सुरक्षेचे ग्रामीण पोलिसांकडून ऑडिट; पुरातत्त्व, वनविभागाला सूचना

By राम शिनगारे | Published: January 5, 2023 06:34 PM2023-01-05T18:34:07+5:302023-01-05T18:35:11+5:30

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासह सुरक्षा यंत्रणा जोरदार तयारी करीत आहेत.

Ajantha-Ellora Caves Security Audit by Rural Police; Intimation to Archaeology, Forest Department | वेरूळ, अजिंठा लेण्यांच्या सुरक्षेचे ग्रामीण पोलिसांकडून ऑडिट; पुरातत्त्व, वनविभागाला सूचना

वेरूळ, अजिंठा लेण्यांच्या सुरक्षेचे ग्रामीण पोलिसांकडून ऑडिट; पुरातत्त्व, वनविभागाला सूचना

googlenewsNext

औरंगाबाद : ग्रामीण पोलिसांनी जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा येथील लेण्यांचे सुरक्षा ऑडिट केले आहे. या ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना केंद्रीय पुरातत्त्व, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून केल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिली.

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासह सुरक्षा यंत्रणा जोरदार तयारी करीत आहेत. परदेशातील पाहुणे शहरात आल्यानंतर जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा येथील लेण्यांना भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी पाहुण्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी लेण्यांच्या सुरक्षेचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार केलेल्या ऑडिटमध्ये लेण्यांमध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव, संरक्षक भिंत पडलेली असल्यामुळे कोठूनही नागरिक आतमध्ये येतात, तिकीट खिडकीसह लेण्यांमध्ये ठिकठिकाणी खाजगी सुरक्षारक्षकांची कमतरता दिसून आली. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, संरक्षक भिंत दुरुस्त करावी आणि खाजगी सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्याच्या सूचना ग्रामीण पोलिसांनी केल्या. त्याशिवाय लेण्यांच्या वरील भाग हा वनविभागाच्या मालकीचा आहे. लेण्यांच्या माथ्यावर मोठ्या प्रमाणात ठिसूळ दगड आहे. त्यामुळे कोणत्याही वेळी हे दगड लेण्याच्या समोरील भागात येऊ शकतात, असेही ग्रामीण पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे वनविभागाने वरतून येणारे दगड रोखण्यासाठी जाळी बसवावी, असेही ग्रामीण पोलिसांनी वनविभागाला कळविले आहे.

वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंदोबस्त
वेरुळसह अजिंठा लेण्यांच्या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांचा त्या ठिकाणी कायमस्वरूपी बंदोबस्त लावला आहे. शनिवार, रविवारच्या दिवशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्या दिवशी पोलिस ठाणे व वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिसही तैनात केले जातात, अशी माहिती अधीक्षक कलवानिया यांनी दिली.

पोलीस मदतीसाठी तत्पर
जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा येथे पर्यटकांना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्यांनी ११२ वर संपर्क साधल्यास ग्रामीण पोलिस तत्काळ मदत करतील. काही महिन्यांपूर्वी एका परदेशी पर्यटकास फसविले होते. तेव्हा स्टेशन डायरीतील नोंदीवरून संबंधित परदेशी पर्यटकाला मायदेशी परतल्यानंतर फसवणूक झालेली दोन लाख रुपयांची रक्कम परत केली होती. त्यामुळे पर्यटकांनी कोणताही त्रास असेल, तर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा.
- मनिष कलवानिया, पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण

Web Title: Ajantha-Ellora Caves Security Audit by Rural Police; Intimation to Archaeology, Forest Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.