अजिंठा- वेरूळचा ‘आयकॉनिक’ स्मारकांमध्ये समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 02:56 PM2019-07-06T14:56:39+5:302019-07-06T14:59:55+5:30

अर्थसंकल्पाने दिला औरंगाबादसह पर्यटनप्रेमींना सुखद धक्का

Ajantha - Ellora's including 'iconic' monuments list | अजिंठा- वेरूळचा ‘आयकॉनिक’ स्मारकांमध्ये समावेश

अजिंठा- वेरूळचा ‘आयकॉनिक’ स्मारकांमध्ये समावेश

googlenewsNext
ठळक मुद्दे पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा अर्थसंकल्पात १७ ‘आयकॉनिक’ स्मारके निश्चित करण्यात आली आहेत.

औरंगाबाद : सध्या वेगवेगळ्या समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या औरंगाबादच्यापर्यटनाला उभारी मिळण्याच्या दृष्टीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन चांगला निर्णय घेतला आहे. या अर्थसंकल्पात अजिंठा आणि वेरूळ या महाराष्ट्रातील दोन पर्यटन स्थळांचा समावेश ‘आयकॉनिक’ स्मारकांमध्ये करण्यात आला असून, यामुळे औरंगाबादच्या पर्यटनाला सुखद धक्का मिळाला आहे.

पर्यटन आणि संस्कृती यांना चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी अधिक चांगल्या सुविधा निर्माण करणे, स्थानिकांचे कौशल्य विकसित करणे, स्थानिकांचा सहभाग वाढविणे, आणि स्थळाचे ब्रँडींग करणे या  प्रमुख बाबींचा या योजनेत समावेश असेल.   यासंदर्भात केंद्रीय पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक शिवाकांत वाजपेयी म्हणाले की, या अर्थसंकल्पात देशभरातून १७ ‘आयकॉनिक’ स्मारके निश्चित करण्यात आली आहेत. या १७ पर्यटनस्थळांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यात येणार आहेत. यासाठी नक्की किती रुपयांची तरतूद केली, हे स्पष्ट केलेले नाही, पण यानिमित्ताने सध्या पर्यटनाच्या बाबतीत पिछाडीवर पडलेल्या औरंगाबादला आता पुन्हा नवी उभारी मिळेल आणि जागतिक नकाशावर औरंगाबाद पुन्हा एकदा झळकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

यासोबतच लोप पावत जाणाऱ्या आदिवासी संस्कृतीलाही उभारी देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून झाला आहे. आदिवासींची संस्कृती, रीतिरिवाज जाणून घेण्यासाठी अनेक परदेशी अभ्यासक उत्सुक असतात. त्यांच्यासाठी खास ‘ट्राइब्स हेरिटेज’ची घोषणा करण्यात आली आहे. देशभरातील ज्या-ज्या राज्यांमध्ये आदिवासींची संख्या आहे, अशा सगळ्याच राज्यांना या तरतुदीचा फायदा होईल. या माध्यमातून त्या-त्या प्रदेशांमध्ये रोजगारनिर्मिती होईल, पर्यटनाचा विकास होईल आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आजही उपेक्षित असलेला आदिवासी समाज मुख्य प्रवाहात येण्यास गती मिळेल. पर्यटन आणि संस्कृती या दोन्ही क्षेत्रांत केलेल्या तरतुदींचा राज्याला निश्चितच फायदा होईल, असे वाजपेयी यांनी सांगितले. 

अर्थसंकल्पातील १७ पर्यटन स्थळे
ताजमहाल (उत्तर प्रदेश), फतेहपूर सिक्री (उत्तर प्रदेश), अजिंठा (महाराष्ट्र), वेरूळ (महाराष्ट्र), हुमायूँची कबर (नवी दिल्ली), लाल किल्ला (नवी दिल्ली), कुतुब मीनार (नवी दिल्ली), कोलवा बीच (गोवा), अमेर फोर्ट (राजस्थान), सोमनाथ (गुजरात), धोलावीरा (गुजरात), खजुराहो (मध्यप्रदेश), हम्पी (कर्नाटक), महाबलीपुरम (तामिळनाडू), काझीरंगा (आसाम), कुमाराकोम (केरळ), महाबोधी (बिहार).

Web Title: Ajantha - Ellora's including 'iconic' monuments list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.