अजिंठा रोड, स्वच्छतागृह, बसची अवस्था भयंकर; पर्यटन राजधानीत परदेशी पाहुणे वाढणार कसे?

By संतोष हिरेमठ | Published: October 12, 2023 01:09 PM2023-10-12T13:09:59+5:302023-10-12T13:10:51+5:30

टुर्स ऑपरेटर्संनी अजिंठा, वेरुळ लेणीतील या स्थितीकडे वेधले लक्ष

Ajantha Road, toilets, buses are in dire condition; How will foreign visitors increase in the tourism capital? | अजिंठा रोड, स्वच्छतागृह, बसची अवस्था भयंकर; पर्यटन राजधानीत परदेशी पाहुणे वाढणार कसे?

अजिंठा रोड, स्वच्छतागृह, बसची अवस्था भयंकर; पर्यटन राजधानीत परदेशी पाहुणे वाढणार कसे?

छत्रपती संभाजीनगर : अजिंठा हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असल्याने अनेक परदेशी-स्थानिक पर्यटक येतात, परंतु छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा या रस्त्याची स्थिती चांगली नाही. अनेक वर्षांपासून काम सुरूच आहे. वाहतूक कोंडीचा त्रास होतो. याबरोबरच अजिंठा, वेरुळ लेणीतील अनेक असुविधांवरून टूर ऑपरेटर्सनी नाराजी व्यक्त केली.

इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सचे (आयटो) चार दिवसीय ३८ वे कन्व्हेन्शन (राष्ट्रीय अधिवेशन) २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान शहरात पार पडले. या अधिवेशनाला देशभरातील ९०० पेक्षा अधिक टूर ऑपरेटर्स, पाहुणे उपस्थित होते. परिषदेनंतर टूर ऑपरेटर्सनी अजिंठा, वेरुळ लेणीसह पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. ही पर्यटनस्थळे आणि येथील पायाभूत सुविधा टूर ऑपरेटर्सना दाखविल्यानंतर परदेशी पर्यटकांसाठी त्यांच्या पॅकेजमध्ये या स्थळांचा समाविष्ट करतील, हा या भेटीमागील उद्देश होता. या प्रतिनिधींनी याठिकाणी भेट दिल्यानंतर तेथील परिस्थितींविषयी संघटनेला ‘फिडबॅक’ दिला. त्यातील अनेक बाबी चिंताजनक आहे. त्यामुळे या स्थितीकडे लक्ष देऊन पर्यटकांना जागतिक दर्जाचा अनुभव आणि या स्मारकांमधील सेवा देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सचे (आयटो) राष्ट्रीय अध्यक्ष राजीव मेहरा यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे महासंचालक, पर्यटन मंत्रालयाचे सचिव, महाराष्ट्र राज्य पर्यटन प्रधान सचिव, पर्यटन संचालक, ‘एमटीडीसी’ व्यवस्थापकीय संचालक आदींकडे केली आहे.

वर्षभरात व्हावी सुधारणा
‘एटीडीएफ’च्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी म्हणाले, फीडबॅकमधून ज्या बाबी, समस्या मांडण्यात आल्या आहे, ज्या मागण्या करण्यात आल्या आहेत, त्या आगामी वर्षभरात शासनाने पूर्ण केल्या पाहिजे. टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंग म्हणाले, पर्यटनस्थळांवरील या स्थितीत सुधारणा झाली पाहिजे.

टुर्स ऑपरेटर्संनी अजिंठा, वेरुळ लेणीतील या स्थितीकडे वेधले लक्ष
- परदेशी पर्यटकांसाठी स्वच्छतागृहाची सोय नाही आणि जी अस्तित्वात आहे ती दयनीय आहे. परदेशी पर्यटक ती वापरू शकत नाहीत.
- अजिंठा आणि वेरुळ येथील शौचालये भारतीय शैलीची आहेत. परदेशी पर्यटकांसाठी कमोड असावेत.
- अजिंठा लेणीत शेड असलेले बेंच नाही. काही ठिकाणी वारंवार पादत्राणे काढावी लागतात. त्यावर पर्याय असावा.
- अजिंठा लेणीत फेरीवाल्यांकडून छळ केला जातो. हे घटनास्थळाचे नकारात्मक चित्र दाखविते.

अजिंठा लेणीत ४ वेळा पैसे मोजण्याची वेळ
अजिंठा लेणीत पर्यटकांना पर्यावरण आणि स्थानिक सुविधा वापरण्यासाठी, पार्किंग, बस आणि लेण्यांना भेट देण्यासाठी अशाप्रकारे ४ वेळा पैसे मोजावे लागतात. हे सर्व एका तिकिटात एकत्रित असू शकतात, असे प्रतिनिधींनी नमूद केले.

बसची स्थिती वाईट
अजिंठा लेणीतील बसेस पर्यटकांसाठी अनुकूल नाहीत. बसमध्ये प्रवेश करण्याची जागा रस्त्यापासून अंदाजे २ फूट उंच आहे. वृद्ध व्यक्तिंसाठी किंवा गुडघेदुखी असलेल्या लोकांसाठी योग्य नाही आणि ते अपंगांसाठी अनुकूल नाही. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बसचा दर्जा बदलून आधुनिक इको-फ्रेंडली ‘लो फ्लोअर’ मिनी बसेस किंवा कमी फूटबोर्ड असलेल्या मोठ्या बसमध्ये बदल करण्याची सूचना केली आहे. परदेशी पाहुण्यांसाठी इलेक्ट्रिक किंवा गोल्फ कार्ट उपलब्ध करून द्यावे आणि थोडे अधिक शुल्क द्यावे किंवा चांगली वातानुकूलित सेवा द्यावी, अशी मागणी केली आहे.

लेणीतील गर्दीवर हवे नियंत्रण
वेरुळ लेणीत टूर ऑपरेटर्सनी भेट दिली त्या दिवशी मोठी गर्दी होती. अशा नाजूक वास्तूंना भेट देण्यासाठी एवढ्या गर्दीमुळे येथील दगड निकृष्ट होण्याचा आणि पायऱ्या जीर्ण होण्याचा धोका वाढत आहे. अजिंठा येथे एका लेणीत ४० जणांना प्रवेशाची मर्यादा पाळली जात नाही. अजिंठा, वेरुळ लेणी येथील पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण हवे, असेही सुचविण्यात आले.

Web Title: Ajantha Road, toilets, buses are in dire condition; How will foreign visitors increase in the tourism capital?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.