'तंटामुक्ती'च्या निवडीवरून अजिंठ्याच्या सरपंचाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 02:10 PM2018-10-04T14:10:54+5:302018-10-04T14:19:32+5:30
अजिंठ्याच्या सरपंच दुर्गाबाई पवार यांना मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजता सिल्लोड पंचायत समिती कार्यालयात घडली.
सिल्लोड (औरंगाबाद ) : अजिंठ्याच्या सरपंच दुर्गाबाई पवार यांना मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजता सिल्लोड पंचायत समिती कार्यालयात घडली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर तक्रार मागे घे म्हणून मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या तक्रारीवरून सरपंच, पंचायत समिती सदस्यांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबूलाल झलवार, असे सरपंचांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे, तर झलवार यांच्या तक्रारीवरून अजिंठ्याच्या सरपंच दुर्गाबाई पवार, तंटा मुक्त समिती अध्यक्ष अब्दुल अजीज, पं.स. सदस्य अलीबिन तमिमी चाऊस, महंमदखान पठाण यांच्याविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, अजिंठ्याच्या तंटामुक्त अध्यक्षपदी अब्दुल अजीज अल्कसेरी यांची गत महिन्यात निवड झाली होती. ती निवड बेकायदा झाली आहे. त्यात आवश्यक अधिकारी व लोकांना न बोलविता निवड झाली असून, ही निवड रद्द करावी, अशी तक्रार अजिंठा येथील बाबूलाल देवचंद झलवार यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती. यावर बुधवारी सुनावणी ठेवण्यात आली.
सकाळी ११.३० च्या दरम्यान, सहायक गटशिक्षणाधिकारी राठोड, विस्तार अधिकारी पी.बी. दौड सुनावणीस हजर झाले. यावेळी ग्रामसेवक हजर नसल्याने अजिंठ्याच्या सरपंच दुर्गाबाई बंडू पवार पाणी पिण्यासाठी बीडीओ यांच्या समोरील दालनात गेल्या असता तेथे बाबूलाल झलवार यांनी सरपंच दुर्गाबाई यांना मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केली, तसेच विनयभंग केला, अशी तक्रार पवार यांनी दिली. यावरून झलवारविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यासोबतच अजिंठ्याचे तंटामुक्तगाव समिती अध्यक्ष अब्दुल अजीज यांच्याविरुद्ध केलेली तक्रार मागे घे, असे म्हणून सरपंच दुर्गाबाई पवार, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष अब्दुल अजीज, पं.स. सदस्य अलीबिन तमिमी चाऊस, महंमदखान पठाण यांनी बेदम मारहाण केली, तसेच सोन्याची अंगठी, रोख १० हजार रूपये हिसकावून घेतले, अशी तक्रार झलवार यांनी केली. यावरून चौघाजणांविरुद्ध ४९४, ३४ आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, फौजदार कुटुंबरे हे करीत आहेत.
अखेर दोन्ही गटांविरूद्ध गुन्हा दाखल
बुधवारी सकाळी ११.३० वाजता सिल्लोड पंचायत समिती कार्यालयात हा प्रकार घडला. मात्र, सरपंच या काँग्रेसच्या आहेत, तर बाबूलाल झलवार हे भाजप गटाचे असल्याने दिवसभर गुन्हा दाखल करावा किंवा करू नये, यावरून वरिष्ठ पातळीवरून पोलिसांवर दबाव येत होता; पण पोलिसांनी कुणाच्याही दबावाची चिंता न करता दोन्ही गटांविरुद्ध अखेर बुधवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले.
चौघे ताब्यात
च्याप्रकरणी सिल्लोड पोलिसांनी अजिंठ्याचे तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष अब्दुल अजीज अल्कसेरी, पंचायत समिती सदस्य अलीबिन तमिमी चाऊस, महंमदखान पठाण, बाबूलाल देवचंद झलवार यांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत या चौघांची वैद्यकीय तपासणी सुरू होती, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार यांनी दिली.