अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव: नागराज मंजुळेंच्या हस्ते आज उद्घाटन, ५५ फिल्म्स प्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 01:18 PM2023-01-11T13:18:14+5:302023-01-11T13:51:36+5:30
महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत चित्रपट प्रदर्शनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन
औरंगाबाद:- जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोंचविणाऱ्या ८ व्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन सोहळा आज सायंकाळी ६ वाजता आयनॉक्स प्रोझोन, स्क्रिन क्र. ४ येथे आयोजित करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलचे उद्घाटन प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटनप्रसंगी सुचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकारचे प्रधान सचिव अपुर्व चंद्रा (आय.ए.एस.) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत.
त्याचप्रमाणे फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी सांस्कृतिक कार्यविभाग महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव विकास खरगे, सांस्कृतिक कार्य संचालक बिभिषण चवरे, औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र के.एम. प्रसन्ना, प्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रसिध्द अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद, चित्रपट दिग्दर्शक प्रतिमा जोशी, अभिनेता पुष्कर जोग, मनजीत प्राईड ग्रुपचे नितीन बगाडिया आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ओपनिंग फिल्म:
महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत चित्रपट प्रदर्शनासह विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. फेस्टिव्हलच्या ओपनिंगला 'आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स' चित्रपट दाखवला जाणार आहे. हा 2022 सालचा स्पॅनिश भाषेतील कमिंग-ऑफ-एज, व्हॅलेंटीना मॉरेल दिग्दर्शित ड्रामा चित्रपट असून ज्यामध्ये रेनाल्डो अमीन गुटिएरेझ, डॅनिएला मारिन नॅवारो, व्हिव्हियन रॉड्रिग्ज आणि अॅड्रियाना कॅस्ट्रो गार्सिया यांच्या भूमिका आहेत. ग्रेगोइर डेबैली आणि बेनोइट रोलँड यांनी निर्मित केलेला हा चित्रपट कोस्टा रिका, बेल्जियम आणि फ्रान्सची सहनिर्मिती आहे.
जगभरातील ५५ फिल्म्सचे होणार प्रदर्शन
यासह दि. ११ ते १५ जानेवारी २०२३ महोत्सवात जगभरातील ५५ फिल्म्सचे होणार प्रदर्शन आहे. तसेच यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शक व चित्रपट अभ्यासक अरूण खोपकर (मुंबई) यांना त्यांच्या भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल प्रदान करण्यात येणार आहे. फेस्टिव्हलचा समारोप सोहळा रविवार, दि. १५ जानेवारी २०२३ रोजी सायं. ७ वाजता आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे.