मराठवाड्यात अजितदादांनी दिग्गज उतरवले मैदानात; मुंडे, सोळंके, बनसोडे लढाईस सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 03:06 PM2024-10-23T15:06:55+5:302024-10-23T15:08:38+5:30

मराठवाड्यात अजितदादांनी दिले ५ उमेदवार; दिग्गज उमेदवारांना विरोधकांच्या रणनीतीला भेदण्याचे आव्हान

Ajitdad gave 5 candidates in Marathwada; Challenge to Dhananjay Munde, Prakash Solanke, Sanjay Bansode to maintain the fort | मराठवाड्यात अजितदादांनी दिग्गज उतरवले मैदानात; मुंडे, सोळंके, बनसोडे लढाईस सज्ज

मराठवाड्यात अजितदादांनी दिग्गज उतरवले मैदानात; मुंडे, सोळंके, बनसोडे लढाईस सज्ज

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आज आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना परळीतून, माजलगाव येथून माजी मंत्री प्रकाश सोळंके, तर उदगीरमधून युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांना उमेदवारी देण्यात आली असून बदलत्या राजकीय समिकरणात त्यांना विरोधकांच्या तगड्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.

विशेष म्हणजे, बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभेची जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे आहे. पहिल्या यादीत येथील उमेदवाराचे नाव नाही. यामुळे विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट मिळणार का? अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील गेवराई हा मतदारसंघ भाजपाकडे आहे, येथून देखील उमेदवार जाहीर झाला नाही. येथे अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित इच्छुक आहेत. यामुळे आष्टी आणि गेवराई मतदारसंघाची आदलाबदली होणार का यावर राजकीय गोटात चर्चा आहे. 

विरोधकांच्या रणनीतीला भेदण्याचे आव्हान
- परळीतून धनंजय मुंडे यांना पक्षाने पुन्हा एकदा मैदानात उरवले आहे. मुंडे यांच्याविरोधात शरद पवार यांची तीव्र नाराजगी असून त्यांच्या विरोधात मोठी रणनीती आखली जात आहे. आता शरद पवार गट कोणत्या उमेदवारास मैदानात उतरवतो याकडे राज्याचे लक्ष आहे.

- माजलगावमधून माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी यावेळी त्यांच्या पुतण्यासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने पुन्हा त्यांच्याच नावाची घोषणा केली आहे. येथे भाजपाचे देखील ताकद असल्याने सोळंके यांच्याविरोधात मोठी बंडखोरी होण्याची शक्यता आहे. भाजपाचे २०१९चे उमेदवार रमेश आडसकर हे तुतारी हाती घेणार असल्याची शक्यता आहे. 

- सध्या पाथरीमध्ये कॉँग्रेसचे आमदार आहेत. येथून विधानपरिषदेचे आमदार राजेश विटेकर यांच्या आई माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला विटेकर यांना अजित पवार गटाने उमेदवारी दिली आली. येथून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे.

- उदगीरमध्ये मंत्री संजय बनसोडे यांनी पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीमधील भाजपाचे देखील या मतदारसंघात चांगले काम आहे. दरम्यान, भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात गेलेले सुधाकर भालेराव यांनी उमेदवारी मागितली आहे. 

- वसमतमधून चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. येथे शिंदे गटाची मोठी ताकद आहे. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना झाला होता. शिंदे गटाने नवघरे यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे करत नाराजगी व्यक्त केली आहे. 

यांना दिली उमेदवारी: 
परळी- धनंजय मुंडे
उदगीर- संजय बनसोडे
माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे 
पाथरी- निर्मला विटेकर 

Web Title: Ajitdad gave 5 candidates in Marathwada; Challenge to Dhananjay Munde, Prakash Solanke, Sanjay Bansode to maintain the fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.