आकाशवाणी चौक वाहतूक, पादचाऱ्यांसाठी सुरू करा; नागरिक कृती समितीची मागणी

By योगेश पायघन | Published: November 15, 2022 12:05 PM2022-11-15T12:05:00+5:302022-11-15T12:05:49+5:30

आकाशवाणी चौक येथील सिग्नल सुरू करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे

Akashawani CHOWK TRAFFIC, START PEDESTRIANS; Citizen Action Committee Demand | आकाशवाणी चौक वाहतूक, पादचाऱ्यांसाठी सुरू करा; नागरिक कृती समितीची मागणी

आकाशवाणी चौक वाहतूक, पादचाऱ्यांसाठी सुरू करा; नागरिक कृती समितीची मागणी

googlenewsNext

औरंगाबाद : लोखंडी बॅरिकेटस् लावून बंद केलेला आकाशवाणी चौक वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी जवाहर कॉलनी नागरिक कृती समितीतर्फे आकाशवाणी चौकात आंदोलन करण्यात आली. ‘आकाशवाणी चौक खुला झालाच पाहिजे,’ ‘आकाशवाणी चौकात मृत्यू झालेल्या नागरिकांना न्याय मिळालाच पाहिजे,’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या.

आकाशवाणी चौकात लोखंडी बॅरिकेटस् लावून जालना रोडवरील वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे त्रिमूर्ती चौकातून येणाऱ्या नागरिकांना सिडकोकडे जाण्यासाठी मोंढा नाका उड्डाणपुलाखालून वळसा घ्यावा लागतो. त्याचबरोबर मोंढा नाक्याकडून येणाऱ्या वाहनांना त्रिमूर्ती चौकाकडे जाता येत नाही. त्यांना सेव्हन हिल उड्डाणपुलाखालून वळसा घ्यावा लागतो.

लोखंडी बॅरिकेटस् टाकून त्रिमूर्ती चौक ते आकाशवाणी चौकातील बंद केल्याने या चौकात दररोज किरकोळ छोटे, मोठे अपघात होत आहेत. याकडे समितीने लक्ष वेधले. त्रिमूर्ती चौक रस्त्याच्या कामाला गती द्यावी, सिग्नल सुरू करण्याची मागणी यावेळी आंदोलक नागरिकांनी केली. रस्ता खुला न झाल्यास ‘रास्ता रोको’सह आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही दिला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नंदकुमार गवळी, अतिक अली, किरण उबाळे, राजू टोणगिरे, राजू मंडलिक, रितेश क्रीपलानी, विशाल राऊत, गोपाळ पांढरे, बाळासाहेब दाभाडे, उत्तम कांबळे, शेख राजू, अनिल चुत्तर, राजू मंडलिक, अभय भोसले, नरेंद्र भोसले, दत्तात्रय देशपांडे, एकनाथ वाघ आदींसह नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.

जीव मुठीत धरून ओलांडावा लागतो रस्ता
हा चौक आणि वाहतूक सिग्नल बंद केल्यामुळे मोंढा नाका ते सिडको; तसेच सेव्हन हिल ते क्रांती चौकमार्गे येणाऱ्या व जाणारी सर्व वाहतूक भरधाव वेगाने सुरू असते. यामुळे आकाशवाणी चौकात नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

आंदोलक म्हणतात...
सहा महिन्यांपूर्वी आकाशवाणी चौकात रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात माझ्या आईचा मृत्यू झाला होता. अशी घटना पुन्हा कुणासोबत घडू नये, यासाठी हा रस्ता खुला झाला पाहिजे.
- बाळासाहेब दाभाडे, आंदोलक

नागरिकांना घर गाठण्यासाठी आकाशवाणी चौकातून फेरा मारून यावे लागते. विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत आहे. हा चौक पुन्हा सुरू करावा, अन्यथा आंदोलन पुन्हा तीव्र करू.
- नंदकुमार गवळी, आंदोलक

व्यावसायिक असल्याने मला रोज दिवसांतून तीन ते चार वेळा ये-जा करावी लागते. प्रत्येक वेळी वळसा मारण्यात दिवसातून २० किलोमीटरचा फेरा होतो. त्यासाठी इंधनाच्या खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागतोय. शिवाय गैरसोय, वेळेचा अपव्यवयही आहे.
- राजकुमार कंगळे, व्यावसायिक

Web Title: Akashawani CHOWK TRAFFIC, START PEDESTRIANS; Citizen Action Committee Demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.