अयोध्येतून आलेले अक्षता कलश मराठवाडा, खान्देशातील १५ जिल्ह्यांत रवाना
By प्रशांत तेलवाडकर | Published: December 5, 2023 03:36 PM2023-12-05T15:36:56+5:302023-12-05T15:40:01+5:30
अयोध्येत येण्यासाठी संत-महंतांना आग्रहाचे आमंत्रण
छत्रपती संभाजीनगर : २२ जानेवारीला अयोध्येत नवनिर्मित भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी मराठवाडा व खान्देशातील (देवगिरी प्रांत) १५ जिल्ह्यांसाठी रविवारी शहरातून १५ अक्षता मंगल कलश रवाना झाले. १ ते १५ जानेवारीदरम्यान या अक्षता १५ लाख घरांत निमंत्रणासह पोहोचविण्यात येणार आहेत. तत्पूर्वी या अक्षता कलशांचे समरसता यज्ञ करून पूजन करण्यात आले.
किराडपुरा येथील श्रीराम मंदिरातील बालाजी मंदिरात अयोध्येहून आलेले १५ अक्षता कलश ठेवण्यात आले होते. हिंदू धर्मातील विविध संप्रदायांतील प्रतिनिधिक स्वरूपात एकेका दाम्पत्यास यज्ञाला बसविण्यात आले. अक्षता कलशांचे विधिवत पूजन करण्यात आले. नंतर महिलांनी हे अक्षता कलश डोक्यावर घेऊन श्रीराम मंदिरात आणले. तेथे साधू-संतांनीही कलशांचे पूजन केले. यानंतर १५ जिल्ह्यांतील आलेल्या कार्यकर्त्यांकडे कलश सोपविण्यात आले. तसेच श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे भास्करगिरीजी महाराज यांच्याकडेही एक अक्षता कलश सोपविण्यात आला. यानंतर अयोध्येत भगवंतांच्या मूर्ती स्थापनेच्या सोहळ्याला हजर राहण्याचे आमंत्रण संत-महंतांना देण्यात आले.
अयोध्येसाठी देवगिरी प्रांताचे ५० कोटींचे योगदान
विहिंपचे देवगिरी प्रांत अध्यक्ष संजय बारगजे यांनी सांगितले की, मराठवाडा व खान्देश मिळून देवगिरी प्रांत आहे. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर उभारण्यासाठी या प्रांतातील भाविकांनी सुमारे ५० कोटींचे योगदान दिले. या प्रांतातील २० हजार मंदिरांत २२ जानेवारीला मोठा महोत्सव साजरा होईल.
१३ कोटी जप करणाऱ्या भाविकांचा सत्कार
मागील २५ वर्षांत १३ कोटी ‘श्रीराम नाम जप’ करणारे ८५ वर्षीय शिवसिंग बहुरे यांचा विशेष सत्कार संत-महंतांच्या हस्ते करण्यात आला.