पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:02 AM2021-05-14T04:02:51+5:302021-05-14T04:02:51+5:30
औरंगाबाद : या हंगामात विवाह बंधनात अडकण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचा कोरोनामुळे हिरमोड झाला आहे. कारण, अवघ्या २५ ...
औरंगाबाद : या हंगामात विवाह बंधनात अडकण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचा कोरोनामुळे हिरमोड झाला आहे. कारण, अवघ्या २५ वऱ्हाडींच्या साक्षीने व २ तासांतच लग्न लावण्याच्या निर्बंधांमुळे अनेक वधू- वर पित्यांनी आपल्या मुला- मुलीचे लग्न पुढे ढकलले आहे. अक्षयतृतीयेला यंदा मुहूर्त नसला तरी काहींनी याच दिवशी लग्नाचे ठरवले होते. पण, निर्बंध कडक झाल्याने सर्व नियोजन हुकल्याची भावना इच्छुकांमधून व्यक्त केली जात आहे.
पोलीस आयुक्तालयाने मागील नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान ४०११ लग्न सोहळ्यांना परवानगी दिली. त्यावेळी ५० वऱ्हाडींना परवानगी होती. मात्र, मार्चपासून कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शहरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यात लग्न सोहळे साजरे करण्यावर बंधने आणली. आता तर २५ वऱ्हाडी व अवघ्या २ तासांत लग्न लावण्याच्या अटीवरच परवानगी दिली जात आहे. नियमांचा भंग करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. यामुळे अनेक वधू- वर पित्यांनी लग्नाच्या बुक केलेल्या तारखा रद्द करीत लग्न कार्य पुढे ढकलली आहेत.
आता दिवाळीनंतरच परिस्थिती पाहून लग्न तारखा बुक केल्या जातील. नियम कडक झाल्याने काही मंगल कार्यालय मालकांनी स्वतःहून कार्यालये बंद केली आहेत. याचा फटका लग्न उद्योगाला बसला आहे.
चौकट
मे महिन्यात १५ लग्न तिथी
यंदा मे महिन्यात १५ लग्न तिथी आहेत. त्यात १, २, ३, ४, ५, ८, १३, २०, २१, २२, २४, २६, २८, ३० व ३१ तारखांचा समावेश आहे.
चौकट
मंगल कार्यालयाचे गणित बिघडले
आजघडीला शहरात लहान - मोठी २५० मंगल कार्यालये व लॉन्स आहेत. मोठ्या ४० मंगल कार्यालय मालकांनी एकत्र येऊन संघटना स्थापन केली आहे. त्यातील प्रशांत शेळके यांनी सांगितले की, मार्चमध्ये ६ तारखा, एप्रिल ७ तारखा व मे महिन्यात १५ तारखा अशा २८ तारखा होत्या. मात्र, २ तासांत लग्न लावणे, २५ वऱ्हाडीच्या नावाची यादी पोलीस स्टेशनला सादर करणे. नियमांचा भंग झाल्यास ५० हजारांचा दंड या बांधनांमुळे मंगल कार्यालयांनी झालेली बुकिंग रद्द केली. त्यांचे पैसे परत केले. मागील तीन महिन्यांच्या काळात शहरात सर्व मंगल कार्यालये मिळून जवळपास ५० कोटींचा आर्थिक फटका बसला आहे.
चौकट
२ तासात लग्न आटोपून घेणे अशक्य
माझ्या मुलाचे लग्न २२ एप्रिल रोजी ठरवले होते. मात्र, २ तासांत लग्न कार्य आटोपणे अशक्य होते. त्यात २५ लोकांना परवानगी, त्याची यादी पोलीस स्टेशनला द्यावी लागणार. त्यात कोरोनाचा संसर्ग. आमच्याकडे ज्येष्ठांची संख्या जास्त. यामुळे आम्ही बुक केलेली तारीख रद्द केली. आता दिवाळीनंतर परिस्थिती बघून लग्नाची तारीख ठरवू.
अनिल सवाई
नवरदेवाचे वडील (वरपिता)
--
२ तासांत सत्यनारायण पूजा होत नाही, लग्नाचे काय
माझ्या मुलीचे लग्न २५ एप्रिलला ठरवले होते. त्यासाठी जानेवारीत मंगल कार्यालय बुक केले होते. पण, कोरोनामुळे प्रशासनाने निर्बंध अधिक कडक केले. २ तासांत लग्न कार्य संपवावे, अशी अट घातली. दोन तासांत सत्यनारायण पूजा होत नाही. लग्नाचे काय आणि लग्न सोहळा आयुष्यात एकदाच होत असतो. यामुळे आम्ही लग्न सोहळा पुढे ढकलला.
रमेश भाले
वधूपिता