आळंद - बोरगाव अर्ज रस्त्याचे वाजले बारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:05 AM2021-07-27T04:05:41+5:302021-07-27T04:05:41+5:30
आळंद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची डोळेझाक व ठेकेदाराने केलेल्या दर्जाहीन कामामुळे अवघ्या चार महिन्यांतच डांबरीकरण केलेल्या आळंद-बोरगाव रस्त्यावर ...
आळंद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची डोळेझाक व ठेकेदाराने केलेल्या दर्जाहीन कामामुळे अवघ्या चार महिन्यांतच डांबरीकरण केलेल्या आळंद-बोरगाव रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. एकंदरीतच सर्व रस्त्याचेच बारा वाजल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.
लाखो रुपयांचा निधी खर्च करून आळंद ते बोरगाव अर्ज रस्त्याचे काम चार महिन्यांपूर्वी झाले होते. त्यामुळे वाहनधारकांसह या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला, परंतु हा दिलासा फार काळ टिकला नाही. चार महिन्यांतच या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. पहिल्याच पावसाने जागोजागी खड्डे पडल्याने पाणी साचले आहे. चिखल झाल्याने अपघाताच्या घटना होऊ लागल्या आहेत.
या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करून नागरिकांनी हे काम बंदही पाडले होते. त्यानंतर, ठेकेदाराने काम व्यवस्थित करून देऊ, असे आश्वासित करून काही दिवसांतच काम उरकून घेतले. यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. त्याचा फटका आता नागरिकांना बसू लागला आहे. खडतर रस्त्याने प्रवास करणे सर्वाधिक धोकादायक बनले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता साहेबराव जाधव यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
260721\20210726_092431.jpg
आळंद ते बोरगाव अर्ज रस्त्यावर निघालेले डांबर