जायकवाडी धरणात केवळ ४ टक्केच जलसाठा, गतवर्षीच्या तुलनेत २४ टक्के पाण्याची तूट
By बापू सोळुंके | Published: July 26, 2024 07:25 PM2024-07-26T19:25:49+5:302024-07-26T19:37:08+5:30
पावसाळा सुरू होऊन पावणे दोन महिने उलटले तरी मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात उर्ध्वभागातून पाण्याची आवक झालेली नाही.
छत्रपती संभाजीनगर :गतवर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत जायकवाडी प्रकल्पात २४ टक्के पाण्याची तूट आहे. आज केवळ या जलाशयात ४.२२ टक्के जिवंत जलसाठा उरला आहे. यामुळे उरलेल्या पावसाच्या दिवसात जायकवाडी धरण १०० टक्के भरेल का याची चिंता प्रशासनाला आहे.
पावसाळा सुरू होऊन पावणे दोन महिने उलटले तरी मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात उर्ध्वभागातून पाण्याची आवक झालेली नाही. परिणामी जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठा वाढलेला नाही. गतवर्षी मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती होती. मात्र जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भाग असलेल्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात मुबलक पाऊस झाल्याने २६ जुलैपर्यंत जायकवाडी धरणांत २७.९३ टक्के पाणी जमा झालेले होते.यावर्षी मात्र आतापर्यंत मराठवाड्याकडे जशी पावसाने पाठ फिरवली, तशीच अवस्था अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या बेसीन एरियात आहे. मुख्यत: जायकवाडी प्रकल्पात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरातून पाण्याची आवक होते. यासोबतच अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा प्रकल्प भरल्यानंतर गोदापात्रा पाणी येते.
मात्र जायकवाडीच्या उर्ध्वभागातही आवश्यक तेवढा पाऊस झालेला नाही. जायकवाडीत उर्ध्वभागातून पाण्याची आवक नसल्याने जायकवाडीचा जलसाठा वाढलेला नाही. आज शुक्रवारी जायकवाडी प्रकल्पात केवळ ४.२२ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी आजच्या दिवशी २७.९३ टक्के पाणी या प्रकल्पात होते. पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीत जायकवाडी प्रकल्प शंभर टक्के भरेल का, याची चिंता प्रशासनासह शेतकऱ्यांना लागली आहे.
जायकवाडी प्रकल्पावर १ लाख ८० हजार हेक्टर सिंचनक्षमता
जायकवाडी प्रकल्पावर मराठवाड्यातील सुमारे १लाख८० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट होते. यात डाव्या कालव्यावर १लाख ४० हजार हेक्टर तर उजव्या कालव्यावर४० हजार हेक्टरचा समावेश होता. मात्र, गतवर्षी ५६ टक्केच जलसंचय जायकवाडी प्रकल्पात झाला होता. यामुळे निदान खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांना गतवर्षी पाणी देण्यात आले होते. यावर्षी १५ ऑक्टोबरपर्यंत किती पाणीसाठा होतो, यावरच पुढील आवर्तने ठरणार आहे.