बदलती लाइफस्टाइल! महिलांमध्येही वाढले ‘चिअर्स’चे प्रमाण; ग्रामीण महिलाही मद्याच्या आहारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 05:31 AM2022-11-03T05:31:04+5:302022-11-03T05:35:07+5:30
लोण मेट्रो सिटीतील लहानसहान शहरात
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : चार मित्र एकत्र आले तर फेसाळत्या ग्लासासह रंगणाऱ्या ‘चिअर्स पार्ट्या’ हे समीकरण आता मागे पडले आहे. आता तरुणी आणि महिलाही कोणताही विधिनिषेध न बाळगता ‘चिअर्स’ करण्याची संधीच शोधत असून, नारी जातीतही व्यसनाधीनता वाढते आहे. चक्क राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानेच यावर बोट ठेवले आहे. सध्या हे प्रमाण कमी असले तरी मेट्रो सिटीतील लोन सर्वत्र पोहोचले आहे. ही बदलती लाइफ स्टाईल चिंतेचा विषय ठरते आहे.
राज्यात १५ ते ४९ वयातील व्यक्तींमध्ये दारू पिण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यात सध्यातरी महिलांचे प्रमाण एक टक्क्याहून कमी आहे.
परंतु मागील पाच वर्षांच्या तुलनेत त्यात वाढ होते आहे. त्यातही ग्रामीण भागातील महिलांपेक्षा शहरातील महिलांमध्ये दारूचे आकर्षण वाढले आहे.
मुंबई, पुणे, सोलापूर पेक्षा औरंगाबाद जास्त ‘नशिले’
मुंबई, पुणे व सोलापूर या शहरांना औरंगाबादेतील पुरुषांनी दारू पिण्यात चक्क मागे टाकले आहे. एकूण टक्केवारी पाहता औरंगाबादेतील १३.७ टक्के पुरूष दारू रिचवतात असे हा अहवाल म्हणतो.
महिला का पितात?
- ताणतणाव, नैराश्य.
- सहज घेणे मग व्यसन जडणे.
- मित्रांचा आग्रह. माॅडर्न लाइफ स्टाइलचा भाग म्हणून. पती घेतो म्हणून.
- पुरुषांची बरोबरी.
आर्थिक, भावनिक स्वातंत्र्य, घरकाम, नोकरी इ.मुळे ताण वाढतो. जवळची व्यक्ती समजून घेत नसतील तर व्यसन करावे वाटते. मी वेगळी आहे हे दाखविण्यासाठीही महिला व्यसनाकडे वळतात.
- डॉ. संदीप सिसोदे, अध्यक्ष, मानसशास्त्रीय वेल्फेअर असोसिएशन
१५ वर्षांवरील मद्यपान
शहर महिला पुरुष
औरंगाबाद ०.२% १३.७%
मुंबई ०.३% १०.०%
नागपूर ०.४% १७.८%
पुणे ०.२% ११.६%
नाशिक ०.२% १२.२% सोलापूर ०.३% १३.१%