महापौरांनी बंद पाडले दारुचे दुकान
By Admin | Published: July 11, 2017 12:01 AM2017-07-11T00:01:31+5:302017-07-11T00:06:18+5:30
परभणी : येथील देशमुख हॉटेल कारेगाव भागात सुरू केलेले दारुचे दुकान सोमवारी महापौर मीनाताई वरपूडकर यांनी स्वत: दारु दुकानांवर जाऊन बंद केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील देशमुख हॉटेल कारेगाव भागात सुरू केलेले दारुचे दुकान सोमवारी महापौर मीनाताई वरपूडकर यांनी स्वत: दारु दुकानांवर जाऊन बंद केले़ या कारवाईमुळे दारु दुकानदारांची चांगलीच गोची झाली आहे़
राष्ट्रीय महामार्गावरील दारु विक्रीचे परवाने बंद झाल्यानंतर ही दुकाने शहरातील वसाहतींमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे़ यातूनच सुपरमार्केट ते देशमुख हॉटेल या रस्त्यावर वनविभाग आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या समोर दारु विक्रीचे दुकान नागरिकांना गाफिल ठेवून सुरू करण्यात आले़ या भागात अनेक शासकीय कार्यालये, नागरी वसाहत, मुलींची शाळा, खाजगी शिकवण्या असल्याने दारु दुकानांचा त्रास महिला, विद्यार्थिनी व नागरिकांना होण्याची शक्यता निर्माण झाली होती़ या पार्श्वभूमीवर १० जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास महापौर मीनाताई वरपूडकर यांच्यासह या भागातील गणेश टाक, सचिन जवंजाळ, राहुल साळवे, चेतन सरकटे, बालासाहेब तरोटे, अक्षय देशमुख आदींनी थेट दारुचे दुकान गाठले़ यावेळी महापौर मीनाताई वरपूडकर यांनी दारु दुकानदारास चांगलेच खडसावले़ उद्या जर दुकान सुरू राहिले आणि दुकानाची तोडफोड झाली तर त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असे सांगून दुकानाचे शटर ओढून घेतले़ त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधून दुकानाचा परवाना रद्द करण्याच्या सूचना दिल्या़ तसेच महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनाही या संदर्भातील अहवाल तयार करण्याच्या सूचना वरपूडकर यांनी दिल्या़