मद्यपी कारचालकाने दुचाकीस्वारांना उडवले, एकाची प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 03:40 PM2017-11-24T15:40:29+5:302017-11-24T15:43:25+5:30
दारूच्या नशेत तर्रर असलेल्या कारचालक वकिलाने दुचाकीस्वारांना उडवले. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
औरंगाबाद: दारूच्या नशेत तर्रर असलेल्या कारचालक वकिलाने दुचाकीस्वारांना उडवले. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी दिली. हा अपघात गुरूवारी रात्री १ वाजेच्या सुमारास पुंडलिकनगर रोडवरील हनुमानचौकात घडला.
राजू लक्ष्मण बल्लाळ (५५,रा.मुकुंदनगर, मुकुंदवाडी) आणि प्रतिक एकनाथ संकपाळ (१९,रा. हनुमानगर) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना सिडको एन-३ मधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून राजू यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक मुदीराज यांनी दिली. ते म्हणाले की, राजू आणि प्रतिक हे एका दुचाकीने सिडको एन-३ कडून हनुमाननगर चौकाकडे जात होते. याचवेळी मागून सुसाट आलेला कारचालक हनुमान चौकातच पुंडलिकनगरकडे वळण घेत असताना दुचाकीस्वारांना त्यांनी कारची धडक दिली.
हा अपघात एवढा भिषण होता की, दुचाकीस्वार दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. जखमी राजू बल्लाळ यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने ते कोमात आहे. तर प्रतिक हे शुद्धीवर असून त्यांचा जबाब पोलीस नोंदवून याप्रकरणी गुन्हा नोंदविला जाईल. रात्री पोलिसांनी कारचालक अॅड. ज्ञानेश्वर माणिकराव वाघ आणि त्यांच्यासोबतच्या एकाला ताब्यात घेतले तेव्हा ते मद्याच्या नशेत असल्याचे त्यांना समजले. यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात नेऊन तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय तपासणीतही त्यांनी मद्य प्राशन केल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचे पो.नि.मुदीराज म्हणाले.