वैजापूर तालुक्यातील १७ गावांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:02 AM2021-09-15T04:02:27+5:302021-09-15T04:02:27+5:30
वैजापूर : नाशिक जिल्ह्यातील नांदुर मधमेश्वर व दारणा धरण परिसरात होत असलेल्या पावसामुळे नांदुर मधमेश्वर धरणातून रविवारी सकाळी दहा ...
वैजापूर : नाशिक जिल्ह्यातील नांदुर मधमेश्वर व दारणा धरण परिसरात होत असलेल्या पावसामुळे नांदुर मधमेश्वर धरणातून रविवारी सकाळी दहा वाजता गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोदावरीत सध्या १३ हजार ४२७ क्युसेकने विसर्ग सुरू असून, पाऊस व अतिवृष्टी झाल्यास नदीपात्रातील पाण्याच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणांच्या पाणीसाठ्यात होत असलेल्या वाढीमुळे पाण्याचा विसर्ग आवश्यकतेनुसार वाढवण्यात येणार आहे. वैजापूर तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावर सतरा गावे वसलेली असून, पाणी पातळीत वाढ झाल्यास या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांचे तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे, पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्र, ओढा व नाल्यापासून दूर राहावे, पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये, मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये, घाट रस्त्याने प्रवास करू नये, भुसख्ख्लन होण्याची शक्यता असल्याने डोंगर पायथ्याजवळ राहणाऱ्या नागरिकांनी दक्ष राहावे, आदी सूचना दिल्या आहेत.
140921\20210913_123214.jpg
फोटो