नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट
By Admin | Published: July 30, 2014 12:58 AM2014-07-30T00:58:46+5:302014-07-30T01:02:31+5:30
नांदेड :सोमवारपासून सुरु झालेल्या नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात अलर्ट घोषित करण्यात आला आहे़
नांदेड :सोमवारपासून सुरु झालेल्या नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात अलर्ट घोषित करण्यात आला आहे़ या सप्ताहात नक्षल्यांकडून पोलिसांवरील हल्ले आणखी तीव्र करण्यात येतात़ त्यामुळे सीमावर्ती भागात अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला आहे़
पोलिस दलांकडून झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी नक्षलवादी शोक सप्ताह पाळतात़ या काळात पोलिसांवर हल्ले करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, शस्त्रे लुटणे आदींच्या माध्यमातून मरण पावलेल्या नक्षल्यांचा बदला घेण्याचा प्रयत्न केला जातो़ सध्या जिल्ह्यातील सीमावर्ती भागात नक्षल्यांचा मुकाबला करण्यासाठी सी-४७ ही विशेष तुकडी तैनात करण्यात आली आहे़ या तुकडीला शस्त्रे व इतर साहित्य ही सर्व स्वतंत्रपणे असतात़
या काळात पोलिस ठाण्यांवर हल्ला करुन शस्त्रे लुटण्याची शक्यता असल्यामुळे ठाण्यांमध्ये शस्त्र व दारुगोळा ठेवला जात नाही़ त्याचबरोबर पोलिसांकडून गस्तही वाढविण्यात येते़ गेल्या काही वर्षांत सीमावर्ती असलेल्या किनवट, माहूर तालुक्यात नक्षल्यांनी कुठेही घातपात किंवा हल्ला केला नाही़
परंतु शेजारील तेलंगणामध्ये कोम्बिंग आॅपरेशन सुरु असल्यास मात्र आश्रयासाठी ते या ठिकाणी येतात़ तर नांदेड जिल्ह्यात कोम्बिग आॅपरेशन सुरु झाल्यानंतर ते परत तेलंगणात आश्रय घेतात अशी माहिती आहे़ सोमवारपासून सुरु झालेल्या या सप्ताहानिमित्त पोलिस दल मात्र अलर्ट झाले आहे़
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून शेजारील तेलंगणातून किनवट व माहूर तालुक्यात येणाऱ्या सर्व मार्गावर पोलिसांकडून करडी नजर ठेवण्यात येत आहे़ नक्षली जंगल मार्गानेच जास्त ये-जा करीत असल्यामुळे त्यासाठी विशेष गस्ती पथकेही तयार करण्यात आली असून ही पथके जंगल पिंजून काढत आहेत़
त्याचबरोबर या काळात पोलिसांकडून कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात येत असून ग्रामस्थांनाही विश्वासात घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो़
(प्रतिनिधी)