प्रसंगावधान ; धावत्या रेल्वेत चढताना पडलेल्या वृद्धेचे पोलिसाच्या सतर्कतेने वाचले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 15:25 IST2018-06-07T15:00:11+5:302018-06-07T15:25:16+5:30
रेल्वे निघत असताना घाईघाईत डब्ब्यात चढताना पाय घसरून पडलेल्या एका वृद्ध महिला प्रवास्याचे प्राण तेथे उपस्थित असलेल्या पोलिसाच्या सतर्कतेने वाचले.

प्रसंगावधान ; धावत्या रेल्वेत चढताना पडलेल्या वृद्धेचे पोलिसाच्या सतर्कतेने वाचले प्राण
औरंगाबाद : रेल्वे निघत असताना घाईघाईत डब्ब्यात चढताना पाय घसरून पडलेल्या एका वृद्ध महिला प्रवाश्याचे प्राण तेथे उपस्थित असलेल्या पोलिसाच्या सतर्कतेने वाचले. ही घटना बुधवारी दुपारी १.४० वाजेच्या दरम्यान औरंगाबाद रेल्वे स्थानकावर घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी १.४० वाजेच्या दरम्यान सचखंड एक्प्रेस (रेल्वे क्रमांक १२७१५ ) उभी होती. रेल्वे नियोजित वेळेस स्थानकावरून निघत असताना शबाना खान या ५२ वर्षीय प्रवासी महिलेने रेल्वेत चढण्याच्या प्रयत्न केला. रेल्वे प्लॅटफॉर्मवरून निघाली असल्याने त्यांना मध्ये चढता आले नाही आणि त्या पाय घसरून प्लॅटफॉर्मवर पडल्या, यातच त्यांचा हात रेल्वे व प्लॅटफॉर्ममध्ये जाण्याची शक्यता होती. हे दृश्य तेथे कर्तव्यावर असलेले रेल्वे पोलीस विजय वाघ यांच्या निदर्शनास आले, त्यांनी तात्काळ शबाना यांच्याकडे धाव घेत त्यांना तेथून बाजूला केले आणि त्यांचे प्राण वाचवले. याबद्दल शबाना यांनी वाघ यांचे आभार मानले तर सर्व प्रवाश्यांनी त्यांचे स्वागत केले.