जिवंत कर्मचारी दाखवला मृत; महापालिकेतील लिपिकाचा असाही प्रताप
By मुजीब देवणीकर | Published: April 20, 2023 04:00 PM2023-04-20T16:00:12+5:302023-04-20T16:09:03+5:30
ईद तोंडावर आलेली असताना प्रशासनाच्या चुकीमुळे त्या कर्मचाऱ्यास मन:स्ताप करावा लागत आहे.
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील एक चतुर्थश्रेणी कर्मचारी मृत झाल्याचे समजून त्याचे वेतन रोखण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. जिवंत असलेला कर्मचारी जेव्हा माझा पगार का झाला नाही, म्हणून संबधित लिपीक, वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर पोहोचला तेव्हा त्यांना धक्काच बसला. मृत पावलेल्या इतर कर्मचाऱ्याच्या नावाऐवजी संबंधित कर्मचाऱ्याच्या नावासमोर चुकीने फुली मारण्यात आल्याचे चौकशीत निदर्शनास आले.
महापालिकेतील एका कर्मचाऱ्याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. संबंधित विभागातील लिपिक वेतनाची यादी लेखा विभागाकडे पाठविताना मृत कर्मचाऱ्यांच्या नावापुढे फुली मारतो. त्यानुसार मृत कर्मचाऱ्याच्या नावावर फुली मारण्याऐवजी दुसऱ्याच कर्मचाऱ्याच्या नावापुढे शिक्षण विभागाच्या लिपिकाने फुली मारली. त्यामुळे लेखा विभागाने मार्च महिन्याचे संबंधित कर्मचाऱ्याचे वेतन बँकेत जमा केले नाही. इतर सहकारी कर्मचाऱ्यांचे वेतन झाले. ईदनिमित्त सण अग्रीमही मिळाली, पण आपले वेतन बँकेत जमा का झाले नाही? याची विचारणा संबंधित कर्मचाऱ्याने लिपिकाकडे केली. तेव्हा लिपिकाला घामच फुटला. कर्मचाऱ्याने त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, पण कोणीच चूक मान्य केली नाही.
शेवटी लेखा विभागात विचारणा केली असता, तुमच्या विभागाकडून मिळालेल्या यादीनुसार त्यात मृत कर्मचाऱ्यांच्या नावाऐवजी तुमच्या नावावर फुली मारण्यात आली असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे जिवंत असताना देखील कर्मचाऱ्याला मृत घोषित करण्याचा प्रताप एका लिपिकाने केल्याचे समोर आले. हा प्रकार समोर आल्यानंतरही संबंधित कर्मचाऱ्यास अद्याप वेतन देण्यात आलेले नाही. ईद तोंडावर आलेली असताना प्रशासनाच्या चुकीमुळे त्या कर्मचाऱ्यास मन:स्ताप करावा लागत आहे. मजूर पदावरील हा कर्मचारी सध्या दिव्यांग कक्षात काम करीत आहे.